Thursday, June 12, 2025

मालवण शहराची हत्तीरोगाच्या डागातून मुक्तता

मालवण शहराची हत्तीरोगाच्या डागातून मुक्तता

मालवण (प्रतिनिधी) : हत्तीरोगाचे माहेरघर म्हणून मालवण शहराला डाग लागला होता; मात्र हिवताप विभागाने प्रभावी उपाययोजना राबवित हत्तीरोगाचे निर्मूलन करण्यात भरीव यश मिळविले आहे. त्यामुळेच गेल्या बारा वर्षात एकही हत्तीरोगाचा रुग्ण आढळला नाही. परिणामी शहराला लागलेला हा डाग पुसला गेला आहे.


शहरातील बाजारपेठ, धुरीवाडा, दांडीसह अन्य भागात काही वर्षांपूर्वी मोठ्या संख्येने हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आले होते. या रोगामुळे रुग्णांना विकृतीचा सामना करावा लागत होता. जिल्ह्यात एक दोन तालुके वगळता केवळ मालवणातच हत्तीरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने या रोगाचे माहेरघर म्हणून मालवणला पाहिले जात होते. त्यामुळे मालवणला लागलेला हा डाग पुसणे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बनले.


हत्तीरोगाचे वाढणारे रुग्ण पाहता हा रोग आटोक्यात आणण्याबरोबरच नव्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी हिवताप विभागाने शहरात प्रभावी मोहीम राबविली. अनेक रुग्णांचा शोध घेत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पूर्वी जिल्ह्यात हत्तीरोगाचे ८४ रुग्ण आढळून आले होते. त्यातील ६४ रुग्ण हे मालवणातील होते तर उर्वरित रुग्ण हे अन्य तालुक्यातील होते. विकृती असलेल्या रुग्णांना आवश्यक साहित्याचा पुरवठा हिवताप विभागाच्या वतीने करण्यात आला. या रोगावर नियंत्रण मिळविण्याबरोबरच त्याचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान हिवताप विभागावर होते. त्यामुळे या रोगाबाबत जनजागृती करण्यावर मोठा भर देण्यात आला. तत्कालीन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अश्विनी जंगम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मालवणात प्रभावी उपाययोजना, जनजागृतीवर भर दिला.


२००४ पासून घरोघरी उपचारावर भर देण्यात आला. २०११-१२ या वर्षात शेवटचा रुग्ण आढळून आला. याच दरम्यानच्या काळात घरोघरी डीईसी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या गोळ्या नागरिकांनी खाल्ल्याने शरीरातील हत्तीरोग जंतूंचा नाश करण्यात यश मिळाले. ही मोहीम दोन वर्षे राबविण्यात आली. त्यामुळेच गेल्या दहा वर्षाच्या काळात मालवणात एकही हत्तीरोगाचा रुग्ण आढळला नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >