Friday, April 25, 2025
Homeदेशभटक्या कुत्र्यांनी घेतला सात महिन्याच्या मुलाचा बळी

भटक्या कुत्र्यांनी घेतला सात महिन्याच्या मुलाचा बळी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सर्वच शहरांमध्ये वारंवार चर्चेचा विषय ठरतो. या कुत्र्यांनी काही व्यक्तींवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना दिल्ली एनसीआरमधील नोएडा भागात घडली आहे. काही भटक्या कुत्र्यांनी एका सात महिन्यांच्या चिमुरड्यावर हल्ला करून त्याच्या शरीराची अक्षरश: चिरफाड केल्याचा भीषण प्रकार नोएडाच्या सेक्टर १०० मधल्या एका सोसायटीमध्ये घडला आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये चिमुरड्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून आता सोसायटीतील रहिवाशांनी या समस्येवर तातडीने पावले उचलण्यासाठी नोएडा प्रशासनावर दबाव आणायला सुरुवात केली आहे.

नोएडा सेक्टर १०० मधल्या लोटस बॉलेव्हर्ड या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या आवारात एक बांधकाम सुरू होते. त्यासाठी हा चिमुरडा आणि त्याची आई या ठिकाणी आली होती. सोसायटीच्या बेसमेंटमध्ये अनेक भटके कुत्रे असून त्यांना सोसायटीच्या आवारातच खायला घातले जात असल्याचीही माहिती इथल्या रहिवाशांनी दिली.

हा प्रकार उघड झाल्यानंतर तातडीने या चिमुकल्याला नोएडाच्या यथार्थ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रात्रभर त्याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सातत्याने पुढे येत असूनही प्रशासनाकडून त्यावर कोणतीही पावले उचलली जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -