मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणारी मुंबई महानगरपालिका दररोज ३८५ कोटी लिटर (३,८५० दशलक्ष लिटर) इतक्या मोठ्या प्रमाणातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत असते.
या पाणीपुरवठा यंत्रणेच्या तांत्रिक श्रृंखलेमध्ये पीसे येथील बंधाऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे. याच पिसे बंधाऱ्याच्या ‘न्यूमॅटिक गेट’च्या परिरक्षणाचे काम सुरू असल्यामुळे मुंबईतील काही परिसरांमध्ये पाणी पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची आंशिक शक्यता लक्षात घेऊन पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे. यानुसार परिरक्षण कार्य हाती घेण्यात येत असल्यामुळे उद्या १८ आणि परवा १९ ऑक्टोबर रोजी मुंबई शहर व उपनगरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
पावसाळा कालावधीनंतर सालाबादप्रमाणे ‘न्यूमॅटिक गेट’चे परिरक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ही साधारणत: ३१ मीटर राखणे आवश्यक असते. या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे हे काम लवकर हाती घेता आले नाही. पाणी पातळी वाढविण्यासाठी पिसे बंधाऱ्याच्या परिरक्षणाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
यानुसार परिरक्षण कार्य हाती घेण्यात येत असल्यामुळे दोन दिवस मुंबई शहर व उपनगरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईकर नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.