Tuesday, March 18, 2025
Homeअध्यात्मअनन्यतेतच भक्ती जन्म पावते

अनन्यतेतच भक्ती जन्म पावते

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

भगवंतावाचून भक्ती होत नाही. ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की, तिला नवरा असायचाच, त्याप्रमाणे भक्ती म्हटली की, तिथे भगवंत असलाच पाहिजे. भगवंत हा भक्तीचा प्राण आहे. भक्ती आणि माया दोघी भगवंताच्याच स्त्रिया आहेत. पण म्हणून त्या सवती आहेत. दोन सवती एके ठिकाणी सुखाने नांदत नाहीत, हा जगाचा अनुभव आहे. मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास धरावी. म्हणजे ती मायेस आपोआप हुसकावून लावते. मायेचे वर्चस्व नाहीसे झाले की, आपले काम होऊन जाते.

तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडातरी फरक दिसायला पाहिजे; तालमीत जाणाऱ्यांच्या शरीरावर थोडातरी पीळ दिसायला हवा ना! तसेच जो भक्ती करतो, त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे. आपल्याला जर विद्या पाहिजे असेल, तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल, तर भगवंताची संगत धरली पाहिजे, सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे. याकरिता अनन्यतेची अत्यंत जरुरी आहे. अनन्यतेतच भक्ती जन्म पावते. द्रौपदीची अनन्यता खरी. भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणे, हेच अनन्यतेचे स्वरूप. माझी प्राप्ती करून घ्यायची असेल, तर भक्ती हेच साधन आहे, असे स्वतः परमात्म्यानेच सांगितले आहे. जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही, त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही.

समजा, एखाद्या माणसाचे लग्न झाले. तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्थाश्रमी झाला; तरी त्याच्या जीवनांतले इतर व्यवसाय चालूच राहतात. त्याचप्रमाणे, आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचाचे सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतात. जी जी गोष्ट घडेल, ती ती आपण भगवंताला सांगावी. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी, भगवंताला सांगून प्रत्येक काम करावे. भक्तीने भगवंत साधतो आणि फल-आशा आपोआप कमी होतात. म्हणून आपण उपासना किंवा भक्ती वाढवावी. ‘मी देही आहे’, असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो. तसेच मी देवाचा आहेम असे म्हणत गेल्याने आपण देवरूप होऊन जाऊ. पण हे होण्यासाठी सगुणोपासनेची जरुरी आहे. रस्ता चालून गेल्याशिवाय जसे आपले घर गाठता येत नाही, त्याप्रमाणे सगुणोपासनेशिवाय आपल्याला उपाधिरहित होता येत नाही. राम कर्ता आहे, ही भावना म्हणजेच सगुणोपासना आणि हेच खऱ्या भक्तीचे स्वरूप आहे. ‘तू जे देशील ते मला आवडेल’ असे आपण भगवंताला सांगावे आणि ‘माझ्या देवाला हे आवडेल का?’ अशा भावनेने जगात वागावे. घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते, अशी भावना कायम ठेवणे म्हणजेच भक्ती करणे होय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -