दिलीप देशपांडे
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून १५ आक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मुलांना वाचनामध्ये गोडी निर्माण व्हावी, वाचनाचे महत्त्व समजावे, शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, ती निर्माण व्हावी हाच वाचक प्रेरणा दिनाचा उद्देश आहे. अभ्यास एके अभ्यास न राहता अवांतर वाचनही आवश्यक आहे. त्याचे अनेक फायदेही आहेत. अवांतर वाचनाने अनेक संदर्भ मिळतात. आकलनशक्ती वाढते. व्यक्तिगत विकास तर होतोच.
राज्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, यातून हा मुख्यत्वे साजरा व्हावा या उद्देशाने सरकारी पातळीवरूनही निर्देश दिले जातात. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालयांत डॉ. कलामांचे पुस्तकांचे वाचन व्हावे. एक वाचन कट्टा त्यासाठी निर्माण व्हावा, त्यात सगळ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग असावा. सामाजिक स्तरावरही याचा प्रसार करून, या वाचन कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करावी आणि शाळा-शाळांमध्ये पुस्तक पेढी तयार करावी. डॉ. कलाम यांना आदरांजली म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. शिक्षकांनीही डॉ. कलामांच्या पुस्तकांचे वाचन करावे. डॉ. कलामांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारदृष्टी, प्रेरणा देण्याचे कार्य करतील, हा विचार यामागे आहे. स्वयंसेवी संस्था, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शाळेतील या वाचनकट्ट्याला एक पुस्तक किंवा शक्य तेवढी पुस्तके भेट द्यावीत.
शाळांमधून विद्यार्थ्यांना एक तास मुक्तपणे वाचन करण्याचा आनंद मिळावा म्हणून ठेवावा. त्यांना त्या तासाला पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. पुस्तके प्रेरणा तर देतातच, पण महत्त्वाचे म्हणजे ते ज्ञानाचे स्त्रोत आहे. वाचनात अनेकविध गुण आहेत. शब्दसंग्रह समृद्ध तर होतोच. पण ज्ञानाची कक्षाही रुंदावते. मनोरंजन हा भाग तर आहेच. शाळा शाळातून चांगल्या पुस्तकांचे चर्चासत्रांचे आयोजन करणे, एखाद्या पुस्तकावर व्याख्यान, लेखक, कवींना आमंत्रित करून त्यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणणे, मुलांना बोलतं करणे. पुस्तकांचे प्रदर्शन, अशा प्रकारांनी कार्यक्रम केले जावेत. महान व्यक्तींचे जीवनात वाचनाचा पडलेला प्रभाव या विषयावरचे व्याखान ही आयोजित केले जाऊ शकते. एखाद्या पुस्तकावर विद्यार्थ्यांमध्येही चर्चा घडवून आणाली जाऊ शकते.
इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, इंटरनेटच्या मोहजालामुळे वाचन कमी होतेय का? फेसबुक, व्हॉट्सअॅप इंस्टाग्राम यात वाचन संस्कृती हरवत चालली आहे का? हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. त्याचे उत्तर काही अंशी होय असे आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, बंद पडल्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली होते आणि त्या काळात किती अस्वस्थता येते, हे आपण बघितले आहे, अनुभवले आहे. आज ई-बुकचे वाचन मुले करतात, असा दावा केला जातो. पण तो काही खरा नाही. एक पाच-दहा टक्के मुलेही ते वाचत नसावेत. हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद निराळाच असतो. खरे तर निरनिराळ्या विषयांवरील पुस्तके मुलांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे.
हा एक दिवस साजरा करून वर्षभर स्वस्थ बसणे आणि पुढच्याच वर्षी परत एक दिवसाचा वाचन प्रेरणा दिन साजरा करणे ही उद्दिष्टे असू नयेत. केवळ शिक्षण विभागाचा फतवा येतो, म्हणूनचा उपचार नसावा. दर वर्षी कार्यक्रमाच्या बातम्या तर खूप वाचतो. पण शालेय मुलांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सातत्याने प्रयोग आणि प्रयत्नांची गरज आहे.
डॉ. कलाम म्हणतात, ‘विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांमध्ये ही उच्च गुणांची गरज आहे. तो ज्ञानाने संपन्न असावा. विद्यार्थ्यांशी आपुलकी असावी. जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असावा. केवळ पुस्तकी ज्ञान, शिक्षण देणे, एवढेच न करता मुलांची मने उच्च ध्येयाने प्रज्वलित केली पाहिजे.’
विद्यार्थ्यांना टी.व्ही., स्मार्ट फोन, कॉम्पुटर, यापासून काही काळ दूर करून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे हाच या दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. अनेक शाळांमधून हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. नाही असे नाही. पण हा दिवस फक्त तेवढ्याच दिवसापुरता मर्यादित राहायला नको, याचाही विचार व्हायला हवा.
अब्दुल कलाम नेहमीच म्हणत, ‘पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर नेहमीच मला आनंदही मिळाला आहे. ग्रंथ ही माझी सर्वात मौल्यवान अशी ठेव आहे. युवक वाचतील, तर देश वाचेल, अशी त्यांची खात्री होती. ‘वाचाल तर वाचाल’असे आपण नेहमीच म्हणतो. पण त्या बोलण्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त व्हायला हवा.
वाचन महत्त्वाचे का आहे? हा विचार करायला हवा. वाचनाची सवय आपल्याला एक चांगले व्यक्ती बनवू शकते. महान पुरुष आणि स्त्रियांच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की, त्यांच्यापैकी बहुतेक जणांना पुस्तके वाचण्यापासून प्रेरणा मिळाली आहे. अब्दुल कलाम यांनी वाचन फक्त एक छंद न करता गरज म्हणून अधिक वाचन केले. पुस्तके आम्हाला प्रेरित करून ज्ञान देतात. वाचनाद्वारे आपण ज्ञानाच्या वेगवेगळ्या स्त्रोतांशी जोडले जातो. वाचनामध्ये अनेक गुण आहेत. हे आम्हाला बाह्यजगाशी जोडलेले ठेवते. आमचा शब्दसंग्रह समृद्ध होतो. वाचनातून आपल्याला शुद्ध आनंद मिळतो. कादंबरी, कथा, विविध विषयावरील लेख संग्रह, कविता, प्रवास वर्णन, चरित्र, आत्मचरित्र, लेख आपल्या मनाचे मनोरंजन करतात. मनोरंजनाबरोबरच ज्ञान मिळते हे महत्त्वाचे आहे. आपले मन भरकटू देत नाही. वाचनाने आपली कल्पनाशक्ती जागृत होते. नवीन नवीन प्रेरणा मिळतात आणि म्हणूनच तो प्रेरणा दिवस आहे. करिता आपल्यातली वाचनाची आवड वृद्धिंगत करावी. आपल्या सगळ्यांनाच वाचन प्रेरणा दिवसातून वाचनाची प्रेरणा मिळावी, ही अपेक्षा. तेव्हा आनंदाने वाचू या… वाचून समृद्ध होऊ या…