डॉ. मिलिंद घारपुरे
कंपनीमधलं एक ट्रेनिंग. बरी असतात अशी ट्रेनिंग अधूनमधून. एक वेगळा दिवस. मस्त खानपान आणि गुंगी आणणारी एसीमधली लेक्चर्स…!
असंच एक लेक्चर. विषय ‘टीम वर्क.’ अन् एका गमतीदार वाक्याने गुंगी उतरली…
“You should not be a just like a Toppings on pizza” which can be removed any time.”
शुद्ध मराठीत. ‘तुम्ही पोह्यावरच्या शेवेसारखे फक्त चव वाढवण्यापुरते राहू नका.”
कुरकुरीत वाक्य, त्या शेवेसारखंच… गरमागरम वाफाळत्या उपम्यावर किंवा पोह्यावर पेरलेली खुसखुशीत शेव, असली तर छानच!!… नसली तर?? तरी फारसा काही फरक पडत नाही… किंबहुना एखाद्याला आवडत नसेल, तर ती शेव अलगद बाजूला करता येते.
आता या वाक्याला कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायचं का टीका? कॉम्प्लिमेंट अशासाठी की तुमच्या अस्तित्वामुळे सहभागामुळे गंमत येते. टीका याच्यासाठी की, तुम्ही एवढे काही महत्त्वाचे नाही आहात. कधीही सहज बाजूला सारले जाऊ शकता. तुम्ही ऑफिसमधल्या एखाद्या प्रोजेक्टचा भाग असाल किंवा एखाद्या मोठ्या कुटुंबाचा… असलात काय, नसला काय असं असण्यापेक्षा… पोह्यावर वरून पेरलेल्या शेवेपेक्षा लिंबाच्या रसासारखे होऊयात, इतके सहज मिसळून जाऊ की, चव तर वाढवूच आणि बाजूला काढणे पण अशक्य!!