Tuesday, March 18, 2025
Homeमहत्वाची बातमी२३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर...

२३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर…

मुंबईत साहित्य संमेलन

महेश भारतीय

भांडुपस्थित ‘नॅशनल एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेला, साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. वर्धराजन यांनी, वर्षभरामध्ये विविध बारा कार्यक्रम घेण्याचे ठरवले.

मुंबईमध्ये १९९९ मध्ये मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्यानंतर मुंबईला मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान कधीच मिळाला नाही. १९९२च्या बॉम्बस्फोटानंतर, क्रॉस मैदान चर्चगेट इथे भरणारा पुस्तक मेळावा आतापर्यंत कधीच झाला नाही, ही खंत ‘संमत’ साहित्य संमेलनाचे आयोजक, महेश भारतीय यांच्या मनात होती. संस्थेने पुढाकार घेऊन असे साहित्य संमेलन आपण करूया, आम्ही आपल्या मागे आहोत, असे आश्वासन दिल्यामुळे संमत साहित्य संमेलनाचा प्रस्ताव संस्थेने मंजूर केला.

‘संमत’ म्हणजे काय..? तर संस्कृत – मराठी – तमीळ या भाषाभगिनी हातात-हात घालून, शेकडो वर्षे एकत्रित नांदल्या होत्या. मराठा साम्राज्य हे तंजावरपर्यंत गेले होते. आणि या सांस्कृतिक देवाण-घेवाणातून मराठीतले अनेक शब्द तमीळमध्ये गेले आणि तमीळमधले असंख्य शब्द मराठीत आले. त्यावर काम केलेले आणि ही संकल्पना रुजवणारे मराठीतील ख्यातनाम साहित्यिक विश्वनाथ खैरे यांनी संस्कृत-मराठी आणि तमीळ भाषांवर खूप काम केले. त्यांच्या या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न रुईया कॉलेजच्या मराठी विभागाच्या तत्कालीन प्रमुख प्राध्यापिका मीना हेमंत गोखले यांनी केला होता. ज्यावेळी न्यायमूर्ती हेमंत गोखले मद्रास हायकोर्टाचे चीफ जस्टीस बनले त्यावेळी मद्रास विद्यापीठामध्ये संस्कृत – मराठी आणि तमीळ या भाषाभगिनी कशा एक आहेत, यावर प्रकाशझोत टाकणारे दमदार संशोधन प्राध्यापिका मीना गोखले यांनी मांडले होते.

आज भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना आणि जगभर भाषिक वाद उफाळून येत असताना, एक सामंजस्याचा सूर म्हणून येत्या १५ आणि १६ ऑक्टोबरला मुलूंड, पश्चिम येथील एन.ई.एस. इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात भरणाऱ्या या ‘संमत साहित्य संमेलनाकडे’ आपण पाहिले पाहिजे.

देशभर साहित्य चळवळी या निराधार होत असताना आणि निकृष्ट अशी व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी जोर धरू पाहत असताना, अभिजात साहित्य चळवळ निर्माण होणे ही काळाची गरज आहे. वाचनसंस्कृती वाढीस लागावी, म्हणून हे असे उपक्रम राज्याच्या प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात होणे गरजेचे आहे.

संमत साहित्य संमेलनातील ‘महात्मा जोतिराव फुले विचारपीठ’, ‘राष्ट्रीय कवी तिरुवल्लूवर विचारपीठ’ आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारपीठ’ या तीनही सभागृहांत एकूण ६५ वक्ते आणि २५ कवी विविध विषयांवर आपलं विचारमंथन करणार आहेत. मुंबईतील साहित्यात रुची घेणाऱ्या विद्यार्थी, पालक, साहित्यिक, जाणकार यांना हे साहित्य संमेलन म्हणजे बौद्धिक मेजवानीच ठरणार आहे.

संयोजकांनी पारंपरिक साहित्य संमेलनामध्ये, जे वंचित घटकांवर अन्याय होतात ते इथे होऊ नयेत म्हणून, कटाक्षाने काळजी घेतली आहे. ग्रामीण साहित्य, संत साहित्य, पुरोगामी साहित्य, फुले-आंबेडकर साहित्य, दलित साहित्य, स्त्री साहित्य, आदिवासी साहित्य, विज्ञान साहित्य, बाल साहित्य, कला साहित्य, वैचारिक साहित्य अशा सर्व साहित्य प्रकारांना इथे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे हे एक अनोखे असे साहित्य संमेलन आहे.

‘जोहार’ कादंबरीकार सुशील धसकटे हे ग्रामीण साहित्यावर बोलणार आहेत. ‘संत कवयित्री’ या विषयावर वर्षा तोडमल बोलणार आहेत. ‘माध्यम आणि लोकशाही’ यावर डॉक्टर सुधीर गव्हाणे (माजी कुलगुरू एमजीएम विद्यापीठ) हे बोलणार आहेत. महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, प्रा. श्रावण देवरे यांचे विशेष व्याख्यान जोतिराव फुले यांच्या समग्र वाङ्मयावर ठेवले आहे. ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाला, शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, अर्थशास्त्र विभाग प्रमुख (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ) येथील प्रा. डॉ. सुधीर नरवडे यांचे विशेष व्याख्यान ठेवले आहे.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, डॉ. विवेक कोरडे यांचं महात्मा गांधी आणि भगतसिंग यांच्यावर विशेष व्याख्यान ठेवले आहे. तर आदिवासी साहित्यावर डॉ. भौमिक देशमुख, वाहरू सोनावणे, डॉ. हमराज उईके आणि ॲड. लटारी कवडू मडावी यांचे व्याख्यान ठेवले आहे. अण्णा भाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर अमर शेख यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शाहिरी योगदानावर, अविनाश कदम, शिवराम सुखी यांचे ‘सादरीकरण सहित’ व्याख्यान ठेवण्यात आले आहे. दलित पँथर चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे डॉ. महेंद्र भवरे, डॉ. उत्तम अंबोरे, डॉ. आदिनाथ इंगोले यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.

स्त्रीवादावर डॉ. शामल गरुड डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस यांचे विचार आपल्याला ऐकता येणार आहेत. डॉ. अच्युत गोडबोले यांची विशेष मुलाखत डॉ. आकांक्षा गावडे घेणार असून, त्यांच्या साहित्य प्रवासावर आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रकाशझोत टाकणार आहेत, तर प्राध्यापिका वर्षा तोडमल या ‘मुलांच्यासाठी मनाची व्यायाम शाळा’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. सानेगुरुजींच्या बालवाङ्मयावर पत्रकार विजय मांडके आपली भूमिका मांडणार आहेत. ‘साहित्यातील अल्पसंख्याकांचे चित्र’ यावर डॉ. मेहबूब सय्यद प्रकाशझोत टाकणार आहेत, तर महाकवी वामनदादा कर्डक यांचीही या वर्षी जन्मशताब्दी असल्यामुळे, त्यांच्या गीतांवर ‘महाकवी वामनदादा समजावून घेताना’ या विषयावर, प्रा. गंगाधर अहिरे बोलणार आहेत. कवयित्री पुतिया माधवी, यांच्या तमिळ कवितांवर प्रा. स्मिता करंदीकर त्यांची मुलाखत घेणार आहेत, तर प्रसिद्ध तमीळ लेखक आणि पटकथाकार करनकारकी, ‘रामास्वामी आणि जय कांतन यांच्या साहित्यावर’ बोलणार आहेत, तर करण कारकी यांच्या साहित्यावर त्यांची खास मुलाखतही या कार्यक्रमात ठेवण्यात आली आहे.

‘मराठी शाळांचे भवितव्य’ या परिसंवादात डॉ. वीणा सानेकर, सुशील शेजुळे, डॉ. सुनील गायकवाड, सुबोध मोरे हे आपले विचार मांडणार आहेत, तर मराठी कथेच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर प्रा. जी. के. ऐनापुरे आणि प्रकाश बाळ जोशी चिंतनात्मक विचार मांडणार आहेत. वा. सी. बेंद्रे यांच्या साहित्यातील शिवाजी महाराज या विषयावर युवा व्याख्याते विशाल नंदागवळी प्रकाशझोत टाकणार आहेत, तर निवृत्त न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे ‘सामाजिक दस्तऐवजीकरण कसे करावे’ यावर विचार व्यक्त करणार आहेत, तर विस्थापित लोकांचे साहित्य यावर नंदिनी ओझा बोलणार असून, महाभारतातील स्त्री विचार या ‘संस्कृत कार्यक्रमात’ डॉ. सुचित्रा ताजणे बोलणार आहेत.

धार्मिक चिंतनात्मक साहित्यावर या संमेलनात चर्चा होणार आहे. त्यात मराठीतील जैन साहित्यावर प्रा. प्रेमचंद आग्रे आणि बौद्ध साहित्यावर प्रा. संजय मून बोलणार आहेत, तर सैराटचे कलादिग्दर्शक संतोष संखद हे ‘चित्रपटाच्या भाषेवर’ बोलणार आहेत. एकंदरीत संत साहित्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक विचारावर डॉ. प्रदीप कुमार माने चिंतनात्मक बोलणार आहेत, तर ‘इन गोवाचे’ संपादक प्रभाकर ढगे ‘बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर’ बोलणार आहेत. ‘इंग्रजीतून मराठी भाषांतरातील अडचणींवर’ अनंत जोशी आपले विचार मांडणार आहेत. ‘वंचितांची रंगभूमी’ या चर्चासत्रात प्रा. मंगेश बनसोड, प्रा. उर्वशी पंड्या, भालचंद्र कुबल, अविनाश कामत भाग घेणार आहेत, तर ‘कवी संमेलनाचे’ अध्यक्ष सुनील गायकवाड असून ज्येष्ठ कवी सुदेश जगताप आणि बबन सरोदे हे सूत्रसंचालन करणार आहेत. या कवी संमेलनात २५ ज्येष्ठ कवींनी भाग घेतला आहे. या वैचारिक मेजवानीचा समस्त मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे संमत साहित्य संमेलनाच्या संयोजकांचे आवाहन आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -