नाशिक रोड (प्रतिनिधी) : महापालिका फुलेनगर जुनी शाळा न ६७ येथील निवृत्त मुख्याध्यापिकेला महापालिका शिक्षण मंडळाकडून तब्बल ११ वर्षानंतर न्याय मिळाला आहे. तर दोषी असणाऱ्या उपशिक्षिकेवर मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
२०११ मध्ये फुलेनगर जुनी शाळा ६७ येथील निवृत्त मुख्याध्यापिका सुरेखा विठ्ठल खांडेकर यांनी उपशिक्षिका मनीषा निकम या शाळेच्या कामात हलगर्जीपणा करतात. काम करत नसल्यामुळे त्यांची तक्रार मनपा प्रशासनाधिकाऱ्याना केली होती. या कारवाईमध्ये मनपा प्रशासन शिक्षण अधीक्षक चंद्रकांत थोरात आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी चुकीच्या टिपण्या टाकत मुख्याध्यापिका सुरेखा विठ्ठल खांडेकर यांना दोषी ठरवले होते. या संदर्भात मुख्याध्यापिका खांडेकर यांनी वेळोवेळी वरिष्ठ प्रशासनाला अर्ज करून आपली बाजू मांडली होती. ही चौकशी तब्बल दहा वर्ष सुरू होती. चौकशीच्या अंतिम टप्प्यात महापालिकेने त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत चौकशी लावली होती.
या चौकशीमध्ये मनपाच्या उपशिक्षिका मनीषा निकम यांच्यावर आरोप सिद्ध झाले, तर सुरेखा खांडेकर यांना सर्व खोट्या आरोपातून निर्दोष सोडण्यात आलेले असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे मनपा शिक्षण मंडळाचा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रयत्न असफल झाल्यामुळे मनपा शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘अकरा वर्षानंतर न्याय मिळाल्याने समाधान लाभते आहे. मनपा शिक्षण मंडळातील बरबटलेल्या अधिकाऱ्यांमुळे अकरा वर्ष अर्जफाटे करून संघर्ष करावा लागला. अधिकाऱ्यांच्या हुकूमशाहीला लगाम लागल्याचा आनंद होत आहे. म्हणून ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नाही’ असाच अनुभव आला.’ – सुरेखा खांडेकर, निवृत्त मुख्याध्यापिका