Tuesday, July 1, 2025

आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत पालघरच्या ईशाला रौप्य तर सातारच्या अनुष्काला ब्राँझ

आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत पालघरच्या ईशाला रौप्य तर सातारच्या अनुष्काला ब्राँझ

नागपूर : कुवैत येथे सुरू असलेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन महाराष्ट्रीयन खेळाडूंनी मुलींच्या चारशे मीटर शर्यतीत अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदकाची कमाई केली. पालघर जिल्ह्यातील ईशा जाधवने रौप्य तर सातारा जिल्ह्यातील अनुष्का कुंभारने ब्राँझपदकाची कमाई केली.


राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या १६ वर्षीय ईशाने ५६.१६ सेकंद अशी वेळ दिली. पंधरा दिवसापूर्वी आपला सोळावा वाढदिवस साजरा करणाऱ्या ईशाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होय. ती आता मिडले रिले शर्यतीतही सहभागी होणार आहे. कऱ्हाड (जि. सातारा) येथे माजी राज्य क्रीडा मार्गदर्शक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या अनुष्काने ५७.३६ सेकंद अशी वेळ दिली. तिने जुलै महिन्यात कोलंबिया येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर स्पर्धेतही भाग घेतला होता.


स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आकाश यादवने १९.३७ मीटरवर गोळा फेकून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यात भारताच्या सिद्धार्थ चौधरीने ब्राँझपदकाची कमाई केली. त्याने १९ मीटर अंतरावर गोळा भिरकावला. दुसरे सुवर्णपदक मुलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत मिळाले. त्यात अमित चौधरीने अव्वल स्थान प्राप्त केले. त्याने ४ मिनीटे ०४.५९ सेकंदात शर्यत पूर्ण केली. मुलींच्या थाळीफेकीत निकीता कुमारीला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. तिने ४४.१४ मीटर अंतरावर फेक केली.


राष्ट्रीय स्पर्धेत लक्षद्वीपसाठी पदक जिंकणारी पहिली खेळाडू ठरलेल्या मुबस्सिना मोहमने लांब उडीत ५.९१ मीटर अंतरावर उडी मारली आणि पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याची किमया केली. मुलांच्या पोल व्हॉल्टमध्ये कुलदीप कुमारने ब्राँझपदकाची भर घातली. त्याने ४.८० मीटरची कामगिरी केली.

Comments
Add Comment