मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत राजीनामा स्विकारल्याचे पत्र देण्यास महापालिकेला निर्देश दिले आहेत.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीने सुनावणी झाली. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा २ सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. ३ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने सांगितले.
उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचं काय होणार याबद्दल संदिग्धता होती.