Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक शहराच्या मिर्ची चौकात विविध कामांना गती

नाशिक शहराच्या मिर्ची चौकात विविध कामांना गती

मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारणा

नाशिक (प्रतिनिधी) : चिंतामणी बसच्या नुकत्याच झालेल्या अपघातात ११ जणांचा बळी गेल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने विविध कामे हाती घेतली असून शहरातील हॉटेल मिर्ची चौकात गतिरोधक, रंबल स्ट्रीप उभारणी, नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकातही काम केले जात आहे.

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील हॉटेल मिर्ची चौकात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या बांधकाम विभागाने आज दि. १२ ऑक्टोबर रोजी गतिरोधक आणि खडखडाट पट्टी (रंबल स्ट्रीप) या महामार्गावर बसविली आहे. तपोवन बाजुकडून मिर्ची चौक सिग्नल येथील डाव्या बाजुच्या रस्त्याच्या फॅनिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. उर्वरीत तीन बाजूंच्या फॅनिंगची कामे करण्यासाठी फॅनिंगमधील अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे व शेड काढण्यासाठी नगर नियोजन व अतिक्रमण विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

त्यातील काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. जे स्वतःहून अशी बांधकामे काढून घेणार नाहीत, अशांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नाशिक महानगरपालिकेमार्फत तत्काळ उपाययोजने अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. खड्डे बुजवण्यात आले आहेत, पॅच वर्क करण्यात आले आहे. या चौकात येणाऱ्या वाहनांचा वेग मर्यादित होण्याच्या दृष्टीने औरंगाबाद रोडला जाऊन मिळणाऱ्या मनपाच्या रस्त्यावर गतिरोधक, रंबलर उभारण्यात येऊन अपघात प्रवण क्षेत्र आणि गतीरोधकाचा फलक लावण्यात आला आहे.

शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांनी आज या सर्व कामांची पाहणी केली. लवकरच येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यावर दुभाजकही बांधला जाणार आहे. महावितरण अधिका-यांनी आज डीपी बसवण्याबाबत पाहणी केली. मनपाच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मंगळवारी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. नांदूर नाक्यावरुन येणा-या महामार्गाच्या बाजूला सिग्नजवळचे विद्युत रोहित्र हटवण्याबाबत अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे मिर्ची चौकाच्या धर्तीवर नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकातही सुधारणा केली जाणार आहे. शहरातील इतर ब्लॅक स्पॉटबाबतही लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. दुसरीकडे नाशिक रोड विभागात बीएम मटेरीअलने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच वीर सावरकर उड्डाणपूलवरही खड्डे बुजवून पॅच वर्क करण्यात आले आहे. एम. जी. रोडवरही खडी-डांबर टाकून (एमपीएम) खड्डे बुजवण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार होतील याची काटेकोरपणे दक्षता घेतली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -