नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालात आयएमएफने भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज वर्तविताना तो ६.८ टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच जगात सध्या मंदीचे सावट असतानाही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे आयएमएफकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७ टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. चीनचा विकासदर २०२१ मध्ये ८.१ टक्के होता. तर २०२२ मध्ये तो ३.२ टक्क्यांपर्यंत घसरला होता. मात्र, आयएमएफच्या ताज्या अहवालात २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षासाठी चीनचा विकासदर ४.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताच्या विकासदरापेक्षा तो कमी आहे.
आयएमएफनुसार, देशातील महागाई आणि बेरोजगारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबरोबरच कोरोनामुळे उद्भवलेली आव्हाने अद्यापतरी संपलेली नाही.