दिंडोरी (वार्ताहर) : तालुक्यातील लखमापूर येथील हनुमानवाडी शिवारात गेल्या कित्येक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे. धीरज काळे व निवृत्ती देशमुख यांच्या शेताच्या बांधावर या बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमानवाडी परिसरातील वस्तीवर राहणाऱ्या लोकांना अगदी जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागत होती. याआधी देखील या परिसरात बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच जनतेच्या रोषाला वनविभागालादेखील मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत होते. अशा घटनांमुळे वनविभागाचे कर्मचारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेऊन होते. तालुक्यातील लखमापूर येथील हनुमानवाडी शिवारात वनविभागाने पिंजरा लावला असता बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. याठिकाणी तीन बिबटे असून त्यापैकी एक जेरबंद झाला आहे. तर दोन बिबट्यांसाठी परत पिंजरे लावण्यात आले आहेत.
दरम्यान, यावेळी वनविभागाच्या अधिकारी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र तुंगार, वनपाल परिमंडळ अधिकारी, वनरक्षक अण्णा टेकनर, हेमराज महाले, परसराम भोये, रेश्मा पवार, विठ्ठल चौधरी, शांताराम शिरसाठ, बाळू भगरे, आदी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.