मुरबाड (वार्ताहर) : मुरबाड तालुक्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तालुक्यात शिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आपले उदिष्ट असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले.
मुरबाड तालुक्यात स्वांतत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शिक्षणाच्या पाहिजे तशा सुविधा निर्माण झाल्या नाहीत. त्यासाठी मुरबाड येथे विज्ञान कॉलेज, म्हसा येथे विधी कॉलेज तसेच येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा व इतर व्यावसाईक अभ्यासक्रम करता यावा, यासाठी म्हसा येथे अडीच कोटींचे सुसज्ज असे वाचनालय मंजूर केले असून लवकरच ते पूर्ण होईल. तसेच मतदारसंघातील कल्याण तालुक्यातील बापसई येथे तरुण – तरुणींसाठी मोठे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र निर्माण होत असून नामवंत कंपन्यांशी करार झाले आहेत. लगेचच तरुणांना नोकरीत सामावून घेतले जाणार असून सरळगाव एमआयडीसी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांना दुय्यम पीक घेता यावे त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी तालुक्यात हिरेघर, वाघिवली, मढ, वैशाखरे अशा सात ठिकाणी लहान बंधारे बांधण्यात येणार आहेत, त्यामुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले. मुरबाड शहरासाठी पाणी पुरवठा योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण करणार असून पुढचे ४० ते ५० वर्ष मुरबाडकरांना पाण्याचा प्रश्न उद्भवणार नसून शेजारील साजई, फणसोली, देवगाव या गावांनाही पाणी पुरवणार असल्याचे सांगितले.