Friday, March 21, 2025
Homeमहत्वाची बातमीसंघर्षात थकणार नाही, मी कुणासमोर झुकणार नाही : पंकजा मुंडे

संघर्षात थकणार नाही, मी कुणासमोर झुकणार नाही : पंकजा मुंडे

बीड (वार्ताहर) : संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. छत्रपतींनाही संघर्ष करावा लागला. त्यामुळे संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. पण संघर्षात मी थकणार नाही आणि मी कुणासमोर झुकणार नाही, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. भगवान गडावरील आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे यांना ऐकण्यासाठी भगवान गडावर हजारोंची गर्दी जमली होती. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी डोंगर कपाऱ्यातील लोकांना नेहमीच संघर्ष करावा लागत आला आहे, असे म्हटले.

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुंबईतील ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीका केली. मुंबईतही दसरा मेळावा आहे. पण त्यांचा मेळावा म्हटले की राजकीय चिखलफेक असते. पण आपला मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही. तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. चिखल तुडवणे संघर्ष करणे आमच्या रक्तातच आहे. कधीच मी कुणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत. कधीच संधीचा फायदा घेतला नाही ते आमच्या रक्तातच नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. नऊ दिवस नऊ देवींची आराधना आपण केली. त्यासर्व आदिशक्तींच्या चरणी मी नतमस्तक होते. देवीकडून काही मागायचं असेल तर या डोंगरकपाऱ्यातील लोकांना चांगले दिवस येऊदेत असं साकडं मी घालेन. तसंच स्वाभिमानाचे जीवन मागेन आणि मृत्यूदेखील स्वाभिमानाने येऊ देत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या ४० वर्षांच्या राजकारणात साडेचार वर्ष सत्तेची सोडली तर इतर संपूर्ण काळ संघर्षाचाच होता. त्यामुळे त्यांच्यासमोर माझा संघर्ष काहीच नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पोलीस-कार्यक्रेत्यांमध्ये बाचाबाची

पंकजांच्या भाषणानंतर मेळाव्याच्या ठिकाणी पोलीस आणि भाजप समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीमुळे तिथे एक गोंधळ उडाला. या गोंधळादरम्यान काही नेते व्यासपीठावरच अडकले होते. यावेळी व्यासपीठावरून पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, दोन पोलिसांमुळे गोंधळ उडाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी समर्थकांनी केली. या सर्व गोंधळात तीन तोळ्यांचे लॉकेट आणि अनेकांची पाकिटे चोरीला गेली आहेत.

निवडणुकीच्या तयारीला लागा

माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. इतके दिवस मी कधीच यावर बोलले नाही. मौन बाळगले. कारण माझा तसा स्वभाव नाही. तुमचे माझ्यावर प्रेम आहे, श्रद्धा आहे, आस्था आहे, निष्ठा आहे, माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे मला शोभेल असे वागा. पक्षाने तिकीट दिले तर मी २०२४ च्या तयारीला लागणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

जेसीबीतून फुलांचा वर्षाव

तत्पूर्वी पंकजा मुंडे मेळाव्यासाठी गडावर दाखल झाल्या तेव्हा त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी गाडीत त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण यशस्वी मुंडेही होत्या. तर व्यासपीठावर अहमदनगरचे खासदार सुजय विखे, महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

संघटनश्रेष्ठ हीच आमची शिकवण

२०१९ च्या निवडणुकीत राज्यभरात मी सभा घेतल्या. एवढे लोक माझ्यासोबत आले तर माझी ताकद वाढणार की नाही. मी हात जोडून विनंती करते की हा विषय आता बंद करा. काल परवा जन्माला आले नाही. १७ वर्षे राजकारण करत आहे. व्यक्तीपेक्षा संघटन श्रेष्ठ ही आमची शिकवण आहे. मी ते पाळते. मीडियाला मी हात जोडते की हे बंद करा. पुढे कोणती यादी तुमच्याकडे आली की माझे नाव त्यात टाकू नका. मी कुणावरही नाराज नाही. मी का कुणावर नाराज होऊ. मला काहीही मिळाले नाही याचे दुःख मला नाही. समाजाच्या हितासाठी जे होत असेल ते मला मान्य आहे. समाजाला बांधायचे सोडून समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही. मी क्षमाशील आहे, पण तुम्ही त्याला क्षमा करणार नाही याची मला खात्री आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘निवडणूक कोण जिंकणार, हे जनता ठरवेल’ : धनंजय मुंडे

प्रत्येकजण निवडणुकीची तयारी करत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी पक्ष निवडणूक लढवण्याची संधी देतो, तेव्हा संबंधित व्यक्तीला त्या-त्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागते. निवडणूक हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळे कुणी कुठून निवडणूक लढवावी आणि कुठून निवडणूक लढवू नये, हा निर्णय ज्याचा त्याचा पक्ष ठरवेल. पक्षाने जबाबदारी दिल्यास निवडणूक लढवावीच लागेल. शेवटी निवडणूक कोण जिंकणार, हे मायबाप जनता ठरवेल  -धनंजय मुंडे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -