राहुल यात्रा जोडणारी की तोडणारी?

Share

अभयकुमार दांडगे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या देशभरात चर्चेचा विषय बनत आहे, तर महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम कसा होईल, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांचा भाजपमधील पक्षप्रवेश तळ्यात मळ्यात असताना राहुल गांधी यांच्या यात्रेचा महाराष्ट्रात फज्जा उडेल की काय? अशी भीती काँग्रेसच्या दिल्लीस्थित पक्षश्रेष्ठींना आजही आहे. नांदेड जिल्ह्यात ५ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पोहोचणार आहे. नांदेड जिल्ह्यात राहुल गांधी हे सहा दिवस व सहा रात्र मुक्काम करणार आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दृष्टीने पुढील राजकीय गणित ठरविणारी ही भारत जोडो यात्रा अशोकराव चव्हाण यांच्यासाठी व त्यांच्या राजकीय भविष्यासाठी लक्षणीय ठरणार आहे. राहुल गांधी यांचा नांदेड जिल्ह्यात असणारा मुक्काम अशोकराव चव्हाण यांची सत्त्वपरीक्षा घेणारा ठरणार आहे. भारत जोडो यात्रेनिमित्त काँग्रेस पक्षातील राज्य व राष्ट्र पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी सध्या नांदेड जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. ज्या मार्गावरून राहुल गांधी यांची ही यात्रा जाणार आहे, त्या मार्गाची पाहणी करण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांकडून सध्या सुरू आहे. अशोकराव चव्हाण यांच्यासमवेत काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री रमेश बावगे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस संपत कुमार, आशीष दुवा, सोनम पटेल, महिला काँग्रेसच्या संध्या सव्वालाख, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस विनायक देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत ही मंडळी भारत जोडो यात्रेच्या मार्गाची पाहणी करत आहेत. काँग्रेसची राज्य व राष्ट्र पातळीवरील नेतेमंडळी नांदेड मुक्कामी असल्यामागचे कारणही वेगळेच असल्याचे बोलले जात आहे. अशोकराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्ष सोडण्याच्या चर्चेमुळे भारत जोडो यात्रेवर परिणाम होऊ नये यासाठी खुद्द राहुल गांधी यांनीच ही दक्षता घेतली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अशोकराव चव्हाण यांची मुंबईत झालेली भेट तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात नांदेडमध्ये १७ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अशोकराव चव्हाण यांची झालेली जवळीकता लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी वेळीच सावध होऊन विशेष दक्षता घेतली आहे. काँग्रेसला यात्रेदरम्यान महाराष्ट्रात धोका होऊ नये म्हणून नवी दिल्ली येथील एक वेगळी काँग्रेसची टीम नांदेडमध्ये विशेष लक्ष ठेवून आहे. तसे पहिले तर काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजप प्रवेशाबाबत स्पष्टपणे अद्यापही वक्तव्य केलेले नाही; परंतु एक धूर्त राजकारणी याप्रमाणे त्यांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा नेमका निशाणा कोणावर होता हे येणारा काळच सांगू शकेल.

नांदेड जिल्ह्यात देगलूर, नायगाव, नांदेड, अर्धापूर असा १२० किलोमीटरचा टप्पा ही भारत जोडो यात्रा पूर्ण करणार आहे. त्यानंतर ही यात्रा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली त्यानंतर विदर्भातील वाशिम, अकोला, शेगाव, बुलढाणा, जळगाव जांबूत या मार्गाने मध्य प्रदेशात जाणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बारा राज्यांमध्ये तसेच दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. आजपर्यंत या यात्रेने ६७५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ३६८ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे.

तर राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात १८ रात्र मुक्काम असणार आहे. त्यापैकी तब्बल सहा रात्र त्यांनी नांदेड जिल्ह्यात राहणे पसंत केले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची संख्या पाहता व राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील मुक्काम लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील सहा रात्रीचा मुक्काम बरेच काही सांगून जाते. एकंदरीत काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्यासाठी खूप वेगळी असली तरी ही यात्रा महाराष्ट्रासाठी व अशोकराव चव्हाण यांच्यासाठी वेगळीच परीक्षा घेणारी ठरणार आहे. राजकारणात कधी काय होईल, हे कोणालाही सांगता येत नाही. एका रात्रीतून चित्र पलटू शकते, हे महाराष्ट्रातील जनतेने यापूर्वीही अनेकदा पाहिले आहे. ही यात्रा नांदेडमध्ये येईपर्यंत किंवा नांदेडमध्ये आल्यावर किंवा नांदेडमधून गेल्यानंतर अशोकराव चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला, तर ते आश्चर्य वाटण्यासारखे नसावे. तसेच त्या प्रवेशाचे नांदेड जिल्ह्यात कोणालाही नवल वाटणार नाही. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. त्यामुळे भाजपमध्ये शिस्तीला फार महत्त्व आहे. भाजप कधी, कोणाला कशा पद्धतीने पक्षांमध्ये प्रवेश देईल, हे सध्या तरी कोणालाही सांगता येणार नाही व याचा काही नेम नाही. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात काँग्रेस पक्षासाठी जोडणारी ठरेल की तोडणारी हे देखील येणारा काळच सांगेल.

Recent Posts

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार!

पुनर्विकास एमएमआरडीए करणार; फडणवीस-शिंदेंचा थेट दिलासा! मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १९ इमारतींबाबत…

51 minutes ago

NCERT Textbook Update : सातवीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार !

नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकातून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व…

54 minutes ago

नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळायचं… हेच तुमचं राजकारण का? फडणवीसांनी वडेट्टीवारांना फटकारले!

मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६…

1 hour ago

“तुमच्या नेत्यांना आवरा!” काँग्रेसच्या वाचाळवीरांविरुद्ध भाजपचा हल्लाबोल, पहलगाम हल्ल्यांविरुद्ध वक्तव्यावर संताप

पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेसच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने साधला निशाणा  नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी…

1 hour ago

तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या…

2 hours ago