भंडारा : मविआ काळात धानखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला. शासनाने खरेदी केलेले धान्य सापडलेच नाही. हे धान्य केवळ कागदावरच आहे. त्यामुळे ते शोधावे लागेल व ज्यांनी धान्य गायब केले, त्यांना धरावे लागेल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
भंडारा दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, भंडाऱ्यात धानउत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या शेतकऱ्यांना बोनस मिळालाच पाहिजे. मात्र, मागील सरकारच्या काळात धानखरेदीत भ्रष्टाचार झाला. हा अनागोंदी कारभार दूर झालाच पाहिजे. शेतकऱ्यांचे धान खरेदी झालेच पाहिजे. शेतकऱ्यांच्या नावाने व्यापाऱ्यांचेच धान खरेदी केले जाते, असे आता होऊ नये.
फडणवीस म्हणाले, मागील सरकारच्या काळात जे धान खरेदी झाल्याचे दाखवले गेले, ते धान आम्हाला सापडलेच नाही. ते कागदावरच आहे. हे धान कोणी गायब केले, त्यांना शोधावे लागेल. शेतकऱ्यांशी बेईमानी सहन करणार नाही. मागील सरकारच्या काळात अनेक बोगस संस्था, ज्यांच्याकडे धान साठवणीची जागाही नाही, त्यांनी धान खरेदी केल्याचे दाखवले गेले. शेतकऱ्यांच्या नावाने दुसऱ्यानेच फायदे लाटले. हे आता रोखावे लागेल.
फडणवीस म्हणाले, लवकरच धान खरेदीसाठी बाजारात येणार आहे. त्यांच्या खरेदीची व्यवस्था करावी लागेल. शेतकऱ्यांना बोनस तसेच चांगली मदत मिळालीच पाहिजे. तसेच, धानखरेदीही पारदर्शक होईल, यासाठी प्रयत्न करू. तसेच, भंडारा हा पर्यटनाचा जिल्हा आहे व सिंचन खाते आता माझ्याकडे आहे. त्यामुळे गोसेखूर्द प्रकल्पाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याचे सिंचन व पर्यटन वाढावे, यासाठी प्रयत्न करू.
फडणवीस म्हणाले, भंडारा जिल्ह्याच्या ज्या काही योजना प्रलंबित असतील त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. भंडाऱ्यात मेडीकल कॉजेच उभारण्याचा सकारात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच त्याची कार्यवाही केली जाईल. राज्यात जेव्हा भाजपला इतरत्र यश मिळत नव्हते, तेव्ही भंडारा जिल्ह्याने भाजपला भरभरून दिले आहे. त्यामुळे पुन्हा हा जिल्हा आपल्या हाती घेण्यासाठी चांगले काम करु. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करू.