Friday, April 25, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमहात्मा गांधी: एक स्मरण!

महात्मा गांधी: एक स्मरण!

मृणालिनी कुलकर्णी

“दे दी हमे आजादी, बिना खड़ग बिना ढाल साबरमती के संत तुने, कर दिया कमाल”

मोहनदास करमचंद गांधी! हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते. शांतता, अहिंसा, असहकारच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अहिंसा, सत्य सांगणे, स्वच्छता, संयम आणि उन्नती या तत्त्वांनी ते जगले. नैतिकतेच्या बळावरच त्यांनी जग बदलले आणि जगाला अहिंसेच्या मार्गाने जाण्याची शिकवण दिली.

अहिंसा परमोधर्म:! भारतीय संस्कृतीचा पायाच अहिंसेवर आहे. अहिंसा म्हणजे सर्वाप्रति प्रेम! हिंसेने-हिंसेला उत्तर दिले, तर सर्वनाश होतो. प्रश्नांची उकल होत नाही. क्षमामध्ये शिक्षेपेक्षा अधिक ताकद आहे. अहिंसेने माणसे जोडली जातात. देशात सलोखा व्हावा हाच गांधीजींचा हेतू होता.

आज २ ऑक्टोबर, गांधी जयंती. १८६९ रोजी गुजराथ पोरबंदर येथे मोहनदासांचा जन्म झाला. संयुक्त राष्ट्राने महात्मा गांधींचा गौरव म्हणून २ ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय ‘अहिंसा दिन’ म्हणून साजरा करतात.

मोहनदासांचे वडील पोरबंदरमध्ये दिवाण होते. आईमुळे मोहनदासवर जैन प्रथांचा प्रभाव होता. आईच्या धार्मिक वातावरणात वाढल्याने अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता या तत्त्वांची बीजे त्याच्यात पेरली गेली. बालवयात लग्न, पत्नी कस्तुरबांचे त्यांच्या जीवनात अनन्य स्थान होते. बालवयातच खरे-खोटे, हिंसा-अहिंसा, धर्म-अधर्म इत्यादींविषयी त्यांनी जाणून घेणे सुरू केले. पुराणातल्या ‘श्रावण बाळ आणि राजा हरिश्चंद्र’ या कथांचा मोहनदासांच्या मनावर परिणाम झाला. ते म्हणतात, “मला हरिश्चंद्राची स्वप्ने पडत. सर्वांनीच हरिश्चंद्राप्रमाणे सत्यवादी का होऊ नये? हा विचार मनात घोळे.”

गांधींजी ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात लिहितात, “बालवयात मी चोरून विड्या ओढायचो, मांसाहार खाल्ला, पैसे चोरले; परंतु आपण चुकतोय ही सल मनात टोचत होती. वडिलांना सांगायची हिंमत होत नव्हती. एके दिवशी सारे चिठ्ठीत लिहून ती चिठ्ठी वडिलांना दिली. वडिलांनी चिठ्ठी वाचली नि त्यांचे डोळे दोन विचारांनी पाणावले. १. गांधी घराणे सुसंस्कृत. आपल्या संस्कारित बालकाने असे वागावे याचे दुःख. २. नैतिकतेची जाण; त्याने चूक कबूल केली, म्हणजेच मुलाच्या मनात अजून चांगुलपणा जिवंत आहे.” मोहनदासांनाही समजले, वडिलांनी आपल्याला मारले नाही, ओरडलेसुद्धा नाही, हीच अहिंसा मनात रुजली. मोहनदासांनी स्वतःच्या मनाचा तोल सांभाळत ईश्वराला साद घालून अशी कृत्ये पुन्हा करायची नाहीत, हा दृढ निश्चय केला आणि पाळला.

गांधीजी स्वतःला नेहमी एक सामान्य माणूस मानत. बालवयात त्यांच्या हातून घडलेल्या चुका त्यांनी आत्मकथनात प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि सुधारताना कमीपणा बाळगला नाही. शाळेच्या संदर्भात ते लिहितात, “मला माझ्या हुशारीबद्दल, मिळालेल्या बक्षिसाबद्दल अभिमान मुळीच नव्हता; परंतु माझ्या वर्तनाला मी फार जपत असे. वर्तनात उणीव निघाली की मला रडू येई.”

लंडनमध्ये बॅरिस्टर झाल्यावर एका दाव्याच्या संदर्भात गांधींना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. पहिल्या प्रवासापासूनच वर्णभेदाला सामोरे जाताना त्यांनी अहिंसक मार्गानेच लढा दिला. २१ वर्षांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात स्वतःला आलेले अनुभव, हिंदी लोकांवर होणारा अन्याय, असमानता, वंशभेद, याविरुद्ध आवाज उठवत, हिंदी लोकांना एकत्र करून जाणीव करून दिली. त्याचबरोबर समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले. भारतीय लोकांच्या नागरी हक्कांसाठी प्रवासी वकील म्हणून काम केले. त्याच काळात सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास, विद्वानाशी चर्चा साधल्याने त्यांचा सर्व धर्माविषयी आदर वाढला. आंतरधर्मीय मैत्रीला प्रोत्साहन दिले तरीही कोणत्याही धर्माची सत्यावर मक्तेदारी असू नये, हेही स्पष्ट केलं.

गांधीजी सत्यवादी अहिंसेचे पुजारी होते. अहिंसेत सत्याला खूप महत्त्व आहे. सत्याला बोलण्याची गरज नाही, आपल्या कृतीतून दिसते. अहिंसा हे साधन आहे, तर सत्य हे साध्य आहे.

गांधीजींचे मेन्टॉर गोपाळ कृष्ण गोखले. भारतात आल्यावर गांधी संपूर्ण भारत फिरले नि अस्वस्थ झाले. ‘चला खेड्याकडे’ ही हाक बांधवांना दिली, कारण खेड्यात भारताचे खरे मूळ पाहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या पोशाखात, आहारात आमूलाग्र बदल केला. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल असा साधा वेष. पूर्णतः शाकाहारी, आत्मशुद्धीसाठी, राजकीय चळवळीचे साधन म्हणून दीर्घ उपवास करीत.

भारतात आल्यावर चंपारण येथील शेतकऱ्यांवर लावलेल्या जुलमी कराविरुद्ध लढताना, त्या आंदोलनापासून ते सर्वसामान्यांचे ‘बापू’ झाले. नंतर १९२१मध्ये गांधीजींनी भारतीय काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. कालांतराने गांधीजी, ‘महात्मा’ आणि सुभाषचंद्र बोसांमुळे ‘देश के पिता-राष्ट्रपिता’ म्हणून भारतभर ओळखले जाऊ लागले.

गांधींच्या ‘नयी तालीम’ या शिक्षण संकल्पनेत सर्व कामांना समान आदर आणि मूल्यवान वागणूक देत. आपला देश सुशिक्षित व्हावा म्हणून प्रत्येकाला शिक्षण घेण्यास ते प्रोत्साहित करत. गांधींचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणूनच ६ ते १४ वर्षांच्या मुलांना मोफत शिक्षण आज देत आहोत.

आज स्वच्छ भारत मोहीमही महात्मा गांधींच्या नावाने चालवली जात आहे, कारण गांधी स्वतः स्वच्छताप्रेमी होते. स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींनी ब्रिटिशांच्या वस्तूवर बहिष्कार टाका आणि दररोज खादी कातण्याचे आवाहन लोकांना केले होते. आज तीच खादी ग्लोबल होतेय. ‘चरखा, खादी आणि स्वावलंबन!’

इंग्रजांनी मिठावर लादलेल्या कराच्या विरोधात म. गांधींनी मीठ उचलून, कायदा मोडून काढला. दांडीयात्रेच्या नेतृत्वाने संपूर्ण देशात चैतन्य निर्माण झाले. म. गांधींच्या सत्य-अहिंसा तत्त्वाने नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग (जुनिअर), बाराक ओबामा जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय नेते प्रभावित झाले.

गांधीजींनीच ‘स्वराज्य’ ही घोषणा दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली ‘भारत छोडो’ ही सुरू झालेली चळवळ स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालू राहिली. ३० जानेवारीला प्रार्थनासभेला जात असताना गोळी घालून त्यांची हत्या झाली. नवी दिल्लीतील त्यांच्या राजघाट स्मारकावर ‘हे राम’ हे त्यांचे शेवटचे शब्द लिहिले आहेत.

गांधी जयंतीनिमित्त ‘महात्मा गांधी : एक स्मरण’ करीत माझे त्यांना विनम्र अभिवादन!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -