अनुराधा परब
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा शुभ कार्याच्या आरंभासाठी सर्वात उत्तम मानला जातो. असत्यावर सत्याने मिळवलेला विजय, वाईटावर चांगल्याने केलेली मात यातून मानवी जीवन जगताना कोणत्या गोष्टींचा अंगीकार करावा, याचे अप्रत्यक्ष जीवनशिक्षणच हे सण देत असतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीने असुरांच्या नाशाकरिता धारण केलेली विविध रूपे पूजली जातात. शुंभ, निशुंभ, महिषासुरादि राक्षसांचा वध करून चंडीचा अवतार घेतलेल्या देवी दुर्गेने जगाला भयमुक्त केले, तो दिवस म्हणजे विजयादशमी.
रावणावर स्वारी करण्यापूर्वी राम याच दिवशी शमी पुजून करण्यासाठी निघाल्याचे रामायण सांगते, तर महाभारतामध्ये अज्ञातवासामध्ये जाण्यापूर्वी पांडवांनी शमी वृक्षावर लपवलेली आपली शस्त्रे याच दिवशी पुनश्च: हाती घेतल्याचा संदर्भ मिळतो. विजयादशमीला सिमोल्लंघन केले जाते, यामागे हे वरील दोन संदर्भ विशेष महत्त्वाचे ठरतात ते त्यामागील धार्मिक श्रद्धेमुळे. त्याचेच एक रूप आपल्याला शिवकाळामध्ये देखील पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपैकी बहुतांश मावळे हे मुळात शेतकरी वर्गातील होते. याच काळात मावळे, सरदार नव्या मोहिमेकरिता सज्ज होत असत, असा इतिहास सांगतो. पुराणांत तरी विजयादशमीच्या वेगवेगळ्या कथा वाचायला मिळतात. त्यांपैकी एक वरतंतू ऋषी आणि त्यांचा शिष्य कौत्स आणि रघुराजा यांची कथा होय.
आपल्या गुरूंचे ऋण फेडण्यासाठी कौत्साने गुरुदक्षिणा देण्याचा आग्रहच धरलेल्या कौत्साची इच्छा दानशूर, सामर्थ्यशाली रघुराजामुळे पूर्ण झाली. इंद्राने रघुराजाच्या स्वारीच्या भयाने कुबेराला सांगून शमी – आपट्याच्या झाडावर सुवर्णवर्षा केली. यांतील कौत्साला अपेक्षित तेवढ्या सुवर्णमुद्रा देऊन बाकीच्या मुद्रा रघुराजाने प्रजाजनांमध्ये वाटल्या. त्याच्या या कृतीमुळेच विजयादशमीच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा निर्माण झाल्याची कथा स्कंदपुराणी वाचायला मिळते.
त्याशिवाय गणेशपुराणामध्ये शमी आणि मंदार वृक्ष हे मूळचे कोण होते, शापामुळे त्यांना वृक्षत्व, देवपूजेमध्ये स्थान कसे मिळाले याची कथा येते. या कथा लोकसंस्कृतीमध्ये गुरुऋण पैशांत न मोजण्याचे, ज्ञानासोबतच विनम्रतेचे, जे आपले नाही त्याचा त्याग करण्याचे संस्कार करतात.
सिंधुदुर्गातही हा उत्सव प्रत्येक गावागावांतून मोठ्या उत्साहात साजरा होतो. संस्थानिक दर्जाच्या गावांमध्ये त्याचे स्वरूप हे राजेशाही थाटाचे, राजाच्या मिरवणुकीसारखे डौलदार आणि श्रीमंती, देखणे असते तर जाती-समुदायांमध्ये दसऱ्याचे स्वरूप हे त्या-त्या समाजाच्या अस्तित्वाची रेषा ठळक करणारे असते. किंजवडे, कोटकामथे, साळशी इत्यादी संस्थानातील दसरा उत्सव स्थानिक देवीदेवतांचे सुशोभित तरंगकाठ्यांनी, पालख्यांनी सजलेला; राजदंड, अब्दागिरी, भालदार चोपदार, मानकऱ्यांनी फुललेला; अलोट गर्दीचा असतो, तर दुसरीकडे कृषिवलांचा दसरा हा घराघरांतल्या परंपरांचा वेगळेपणा सांगणारा असतो.
शेतकरी घरातल्या तसेच शेतातल्या वापरातल्या अवजारांची पूजा खंडेनवमीला करतो. केवणीचा दोर, आंब्याची पाने, गोंड्याची फुले, कुर्डूच्या फुलांचे दांडे, भाताच्या लोंब्या (केसुरा), वरईचा केसुरा या गोष्टींचा वापर करून घराला नव्या ऋतूच्या स्वागताचे, विजयाचे तोरण बांधले जाते. आंब्याच्या पानामध्ये वरील गोष्टी ठेवून केवणीच्या दोऱ्यात बांधून पाच पानांचं तोरण तयार केलं जातं. देव्हाऱ्यात पूजलेल्या घटाच्या बाजूलाच अवजारं ठेवून त्यांची खंडेश्वरी म्हणून पूजा केली जाते. खंडेनवमी म्हणजे खड्गनवमी. धनगरांमध्ये यालाच ‘खरगं’ म्हणतात. शस्त्र, अस्त्रं यांचा सन्मान करण्याचा, ऋण मान्य करण्याचा दिवस. तवशाची कापा (गावठी काकडीचे काप) तर काही घरांतून भेंड्याचा (भेंडीभाजी) बळी नैवेद्य म्हणून दिला जातो. घटाभोवतीच्या रुजवणातील हिरवांकुर देवाला, शस्त्रांना वाहिले जातात. तसंच स्वयंपाकघरातील पाण्याची भांडी वगैरे वस्तूंवरही समृद्धी, सुबत्ता आणि देवीचा आशीर्वाद म्हणून ते ठेवले जातात. काकडीच्या साह्याने घराच्या बाह्य भिंतीवर कुंकवाने स्वस्तिक रेखाटून तोरण दाराला बांधले जाते. याला कोकणात “नया पूजन” म्हणतात. सुवासिनी हा नवांकुर केसांतही माळतात. त्यानंतर घट उठवून, देवीची आरती करून नंतर नैवेद्य दाखवला जातो. याच वेळी पाटीवर, कागदावर सरस्वतीचे चिन्ह रेखून त्याचेही पूजन करून रितसर शिक्षणाचा श्रीगणेशा केला जातो. शेतात आलेल्या नवधान्याच्या (भाताचे गोटे) गोट्यांतून शिजवलेली खीर हा नैवेद्यातील प्रमुख पदार्थ असतो. याशिवाय कोकणातल्या वाडीच्या पानावर थापलेले वडे, भात, डाळ, एखादी उसळ हे पदार्थ असतात. ही वाडी प्राणीमात्रांबरोबरच, पितरांसाठीही ठेवून त्यांचे स्मरण करण्याचीही इथली लोकसंस्कृती आहे. देवीच्या श्लोकातच “सर्वभूतेषु” असा शब्द येतो. या स्त्रीवाचक शब्दातील सृष्टीतील सर्वव्यापी चैतन्याचे आणि त्यांच्याविषयीच्या आदराचे प्रतिबिंब या रूपाने लोकाचारामध्ये उमटलेले दिसते. विजयादशमी दिवशी धनगर गावातील त्यांच्या मांडावर कुलदेवतेची पाटी घेऊन येतात आणि तिथे दसरा नवसांच्या पूर्ततेने, नैवेद्याने तसेच गाऱ्हाणे नि गाजानृत्याने साजरा होतो. तर गोसावी समाजामध्ये आश्विनातील द्वादशी दिवशी पतिरांचे उत्थापन होऊन भंडारा होत नवरात्र साजरी होते. गावांतील ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये सोने लुटण्याचा कार्यक्रम स्थानिकांच्या सहभागाने होतो. वर्षातील काही ठरावीक दिवशीच मंदिरातील तरंगकाठ्या या पालखी प्रदक्षिणेसाठी, उत्सवासाठी बाहेर पडत असतात. दसरा हा सण त्यापैकी एक. हे तरंग म्हणजे देवतांचे चलप्रतिनिधी. त्यांचे मंदिराबाहेर पडणे म्हणजे एका अर्थी आजही त्यांच्या सीमेतील सर्वांवर त्यांचे लक्ष असल्याचे सूचन समजले जाते. एक प्रकारची आश्वस्तता, निर्भयता ह्या तरंगकाठ्या उत्सवांच्या निमित्ताने जनमनांत पेरत असतात.
संस्थानातील विजयादशमी उत्सवात देवतरंग, पालखी लवाजम्यासह मंदिरातून बाहेर पडतेवेळी वाजणारे नगारे हे पंचक्रोशीची सत्ताधीश देवता येत असल्याची खाशी वर्दी देत असतात. कोटकामथे, साळशी वगैरे ठिकाणी मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होते. कोटकामथे येथे तर सालंकृत श्रीदेवी भगवतीची दृष्ट काढण्याचा अनोखा सोहळा साजरा होतो. संस्थानिक तसेच संस्थानेतर गावांतील देव सोने लुटण्यासाठी मंदिरातून बाहेर पडतात. ठरलेल्या जागी ठेवलेल्या किंवा असलेल्या आपट्याच्या वृक्ष, फांद्याचे देवांकडून पूजन झाल्यानंतर “देवांनी सोने लुटले” असा त्याचा सांकेतिक अर्थ समजून नंतर ग्रामस्थ त्या सोन्याची लूट करून परस्परांना वाटतात. पुराणकथांतून आलेले हे आपट्याचे पान धन, ज्ञान, संपन्नतेचे प्रतीक समजले जाते. आपट्याचे झाड हे कफपित्तादिंवर गुणकारी तसेच दाह, तहान वगैरेंवर विजय मिळवणारे म्हणून औषधीही आहे. याचे संस्कृत नाव अश्मंतक असून धन्वंतरी निघण्टूमध्ये त्याचे आणखी औषधी उपयोग सांगितलेले आहेत. एकुणातच, निसर्ग आणि उत्सव – लोकपरंपरांची सांगड घालून मानवी जीवनाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे कामच पूर्वजांनी फार विचाराने केलेले दिसून येईल.