Thursday, January 16, 2025

प्राजक्ता

डॉ. विजया वाड

प्राजक्ता होतीच सुरेख. प्राजक्ताच्या फुलासारखी नाजुक नि नक्षीदार. लाल ओठ, गोरापान वर्ण, नाजुक चण नि भुरे केस. प्राजक्ता हे नाव सर्वार्थाने शोभणारी. विद्यावंत होती. आर्ट्समध्ये पीजी. एम.ए. त्यात इंग्रजी वाङ्मय हा विषय. कॉलेजात अध्यापन. चांगला पगार. तरी पण लग्न जुळत नव्हते. का? ते समजतच नव्हते तीर्थरूपांना.
प्रखर वैधव्य योग! हे पत्रिकेतले कारण! कोणता नवरा मरण ओढवून घेईल हो! नव्हते जुळत. पण काही केल्या प्राजक्ता हे कारण दडविण्यास तयार नव्हती. कोणाशी फसवून लग्न करावे, ही तिची इच्छा अजिबात नव्हती.
तरी पण प्रेम बसलेच. अरविंद नामक प्राध्यापकासोबत. फिरणे, एकत्र जेवणे, जास्तीत-जास्त सहवास हे सगळे झाले. प्राध्यापक महाशय एका प्रदीर्घ डेटवर विरघळले. त्यांनी विषय काढला.
“प्राजक्ता, लग्न करावे वाटते.”
“मग कर की.”
“तुझ्याशी करावे वाटते गं.”
“मी तुझ्या मृत्यूला जबाबदार? ना बाबा ना! प्रखर वैधव्ययोग आहे माझ्या पत्रिकेत.”
“लिव्ह इनमध्ये राहू.”
“तुला चालेल?”
“मला काहीही चालेल. तुझ्यासाठी!”
“पण मला चालणार नाही. तू जीवावर उदार झालेलं, तर मुळीच चालणार नाही. मला ते सहनच होणार नाही.”
“अगं, पत्रिका बित्रिका सगळं झूट असतं.”
“काहीही असलं तरी!”
“प्राजू…”
“भावनात्मक निर्णय नाही हा! तू हलक्यात घेऊ नकोस.”
“बरं बाबा. चिडू नकोस.”
“प्राजक्ता, अरविंदची पत्नी होण्याचं भाग्य लाभलं नाही; तरी अरविंदची प्राणसखी होशील ना?”
“हो तर… प्राणसखीच तर आहे मी तुझी. वैवाहिक संबंध मात्र नकोत.”
“असं कसं?”
“विवाह म्हणजे माळा एक्स्चेंज करणं. ते नको म्हटलं मी.”
“पण त्याखेरीज संबंध? ना बाबा ना!”
“दुरून प्रेम करूया.”
“प्रयत्न व्यर्थ आहे. मला राहवणार नाही.”
“असं रे काय?”
अशी समजूत काढणं किती अशक्य होतं. दोन प्रणयातूर जोडप्यांमध्ये, हे का मी तुम्हाला
सांगायला हवं?
“आपण दुसरा पॉवरबाज ज्योतिषी बघू.”
“चालेल.” वेडी आशा! दुसरं काय?
दोघं गेले. दोनदोनदा! दाखवली पत्रिका.
उत्तर तेच. निराश हताश झाले.
“माझा पत्रिकेवर विश्वास नाही. अगं जन्मवेळ चुकीची पण असूच शकते.”
ही एकच शक्यता होती. नर्सला डुलकी लागली. तिने जन्मवेळ चुकीची टिपली; असंही होऊ शकतं ना? पण नर्स आपली आत्याच होती! ती कशी चुकीची वेळ टिपेल?
प्राजक्ताला प्रश्न पडला.
प्रश्न मनात दडवला. अरविंदसमोर उघडला नाही. पण आत्यानेच तो उघडला.
“अरे अरविंद, प्राजक्तावर प्रेम करतोस का तू?”
“हो आत्या. पण पत्रिका! प्राजक्ताची?”
“प्राजक्ताच्या वैधव्य योगाबद्दल बोलायचंय का तुला?”
“हो आत्या.”
“पत्रिका बित्रिका सब झूट असतं.”
“असं कसं आत्या?”
“तू जीवावर उदार होऊन लग्नास तयार आहेस का? अरविंद खरं खरं सांग.”
“घाबरलोय. मी जीवास गमवायला तयार नाहीये आत्या.”
“आवडलं मला. अरविंदच खरं खरं बोलणं.” ती म्हणाली.
आत्याचे खरे खरे उद्गार ऐकून अरविंदला खूप बरं वाटलं.
इतक्यात एक चमत्कार घडला. डॉक्टरांचे पत्र!
प्राजक्ताच्या जन्मवेळी घड्याळ १० मिनिटे मागे होतं.
परत पत्रिका! परत जन्मवेळ! दणदणीत सौभाग्ययोग.
लग्न लागले. सौभाग्य टिकले.
पत्रिका बित्रिका कसलं काय घेऊन बसला राव?
प्राजक्ताच्या विवाहाला १२ वर्षे झालीत. अरविंद सुखी तगडा आहे अजून.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -