Thursday, April 24, 2025

कुटुंब

डॉ. मिलिंद घारपुरे

ठाण्याची येऊर टेकडी, शहरी धामधूमपासून फक्त १५-२० मिनिटांवर असणारा मुक्त निसर्ग. घनदाट जंगल. सावकाश वरती चढत जाणारी दगडी पायवाट. खोल घळी, छोटे-छोटे झरे, पाखरांची किलबिल. वरती टेकडीवर एका बाजूला हिरवागार डोंगराळ निसर्ग आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण शहर. अफाट वृक्षराजी!!! रानवेली, जंगली औषधी, आंबा, वड पिंपळ, जांभूळ, करवंद, बोर, फणस, अगदी नारळसुद्धा…

माळावर भलामोठा औदुंबर. दोन एकशे वर्षांचा तरी नक्कीच. चारजणांनी मिळून कवेत घ्यावा एवढा. शांत स्तब्ध स्थिर घनगंभीर… ‘कटेवरी हात विटेवरी उभा’ अगदी पांडुरंग नारळ कल्पवृक्ष… बापासारखा… सगळ्यांना सगळं देऊन एकटाच खणखणीत ताठ, एकलकोंडा ‘आता राहिलो उपकारापुरता’… असाच काहीसा फणस मात्र आईसारखा. अंगाखांद्यावर अगणीत पिलांचं ‘गोड रसाळ ओझं’ लीलया पेलणारा… गर्द घनदाट हिरवीगार…

‘सळसळ’ ऐकावी फक्त पिंपळपानांचीच, टवटवीत ताजी चकाकती पानं, गात्रागात्रांतून उत्साह… सळसळतं तारुण्य… नवयौवन जीवनरसान रसरसलेलं ओथंबलेलं… आंबा… आजीची कुशी… घनदाट जर्द हिरवी गारेगार… नातवाला पोटभर खायला घालून कुशीत घेऊन गोष्टी सांगत थोपटत म्हणलेली रामरक्षा… गुडुप्प झोप. दुलई घेऊन!!

डेरेदार वड आजोबा, ध्यानमग्न शांत निवांत. दाट सावली आणि जाडजूड आधाराच्या घट्ट पारंब्या. आकाशापर्यंत जाऊन परत जमिनीशी नातं जोडणाऱ्या. काय बिशाद त्या उन्हाची… एक साधी तिरीप हिम्मत करेल तुमच्यावर येण्याची… सावलीत तनमन तृप्त… तृप्तपेक्षा सुरक्षित, आंब्याखाली मात्र शांतताच जास्त पिवळजर्द पांढराशुभ्र चाफा… पत्नी, बायको, सखी, साचिवा, राज्ञी, मैत्रीण, प्रियंवदा प्रेयसी… काय म्हणाल ते… रणरणत्या उन्हातसुद्धा टपोर फुलांनी मदमस्त. आसमंतातला गंध छातीत भरभरून घ्यावा. असो… कुटुंब म्हणजे तरी दुसरं काय, तुमच्या भावभावनांची काळजी घेणारी जपणारी माणसं…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -