सीमा दाते
मुंबई महानगर पालिका आशियातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका, मुंबई महापालिकेचे नाव फक्त मोठी महापालिका एव्हढेच नाही, तर तेवढी जबाबदारी ही मुंबई महापालिकेची आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहरातला आज महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो, केवळ मुंबईलाच नाही, तर ठाणे महापालिका, भिवंडी महापालिका आणि ज्या जलवाहिन्या जमिनीतून आल्या आहेत, त्या १८० गावांना १६० एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. अशी तर मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, तुळशी आणि विहार या सात तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मुख्य दोन तलाव आहेत त्यातून ५० टक्के इतका पाणीपुरवठा होतो, एक तर भातसा आणि मोडक सागर, सध्या तानसा तलावातून दिवसाला ४५५ दशलक्ष लिटर, तर मोडक सागर येथून ४५५ दशलक्ष लिटर, मध्य वैतरणा येथून ४५५दशलक्ष लिटर, अप्पर वैतरणा येथून ६४० दशलक्ष लिटर आणि भातसा येथून २०२० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, तर तुळशी आणि विहार ही सर्वात लहान तलाव असून तुळशी तलावातून दररोज १८ दशलक्ष लिटर, तर विहार तलावातून ९० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.
विशेष म्हणजे ज्या मुंबई शहराला पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे दारारोज मुंबईला ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. यातही विशेष बाब म्हणजे ५० टक्के पाणी हे केवळ गुरुत्वाकर्षणाने जलशुद्धीकरण प्रकल्पात व तिथून मुंबईला पाठवले जाते आता पाणीपुरवठा होतो आणि तो मुंबईला पाठवला जातो इथपर्यंत ठीक आहे. पण पाण्याचे शुद्धीकरण कसे होते? हेही तितकेच महत्त्वाचे तर ते असे की, सगळ्यात आधी भिवंडीजवळ असलेल्या पिसे बंधारा येथे भातसा तलाव जे राज्य शासनाच्या अंतर्गत आहे, त्या तलावातून महापालिका पाणी मागवून घेते. ते पाणी पिसे बंधारा येथे अडवले जाते. साधारण ५० टक्के पाणी येथेच अडवून शुद्ध करून पाठवले जाते.
पिसे बंधाऱ्याला ह्युमनेटिक दरवाजे आहेत. या दरवाजांची २ मीटर उंची वाढवली आहे. पाऊस जास्त झाला की, हे दरवाजे उघडले जातात. याच पिसे बंधाऱ्याला २१ पंप एका ठिकाणी, तर ५ पंप दुसऱ्या ठिकाणी आहेत. म्हणजे एकूण २६ पंप कार्यरत असून १८ ते २० पंप हे २४ तास कार्यरत असतात. त्यानंतर अडवलेले पाणी पंजरापूर येथे शुद्धीकरणासाठी पाठवले जाते. तेथून एकूण २०२० दशलक्ष लिटर पाणी मुंबईला पाठवले जाते. १३०० दशलक्ष लिटर पाणी पंजरापूर येथे शुद्ध केले जाते, तर उरलेले पाणी भांडुप संकुल इटगे शुद्ध करून मुंबईला विविध भागांत पोहचवले जाते, तर पांजरापूर इथल्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी पोहोचविल्यानंतर त्यामध्ये प्रथम पॉली अॅल्युमिनियम क्लोराईड मिसळण्याची पद्धत वापरली जाते. हे पीएसी मिश्रीत पाणी मोठ-मोठ्या टाक्यांमधून नेऊन त्यास संथ होण्यासाठी अवधी दिला जातो. यामुळे पीएसीची प्रक्रिया पूर्ण होऊन जड झालेला गाळ किंवा धूलिकण या मोठाल्या टाक्यांच्या तळाशी बसतात. हा गाळ सतत टाक्यांमधून बाहेर काढला जात असतो. नंतर हे पाणी पूर्णतः गाळण्यासाठी वाळूचा थर असलेल्या टाक्यांमधुन (रॅपिड सँड फिल्टर्स) मधून नेण्यात येते. पूर्णतः गाळलेले / शुद्ध झालेले पाणी फिल्टर बेडच्या तळातून काढून घेऊन निर्जंतुकीकरणासाठी पुढे नेण्यात येते. मात्र शुद्ध पाणी बऱ्याच लांबवर वाहून नेण्याचे असल्याने निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. निर्जंतुकीकरण केलेले पाणी एका महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिक-ठिकाणी असलेल्या सेवा जलाशयापर्यंत पोहोचविले जाते. विशेश म्हणजे या शेवटच्या टप्प्यात शुद्धीकरण झाल्यानंतर बंद वाहिन्यांतून, तर पुढे पाठवले जाते, बाहेरच्या हवेशी त्याचा कोणताही संपर्क येऊ देत नाही. योग्य शुद्धीकरण सुविधांमुळे WHO व IS – १०५०० ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसार जलशुद्धीकरण करणे साध्य झाले आहे.
दरम्यान, शुद्ध पाण्याचा गढुळपणा पूर्ण वर्षभर ००.३ NTU वा त्यापेक्षा कमी असतो व रेसिड्युअल क्लोरीनचे ग्राहकाच्या ठिकाणचे प्रमाण ०.२ PPM एवढे असते. त्यानंतर प्रक्रिया केलेले पाणी जलशुद्धीकरण केंद्राजवळील महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी मुंबई शहरात ठिक-ठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयापर्यंत वितरणासाठी विभागले जाते. यासाठी १२०० मि.मी. ते २४०० मि.मी.च्या पोलादी जलवाहिन्या व २२०० मि.मी. ते ३५०० मि.मी. व्यासाच्या भूमीगत जलबोगद्यांचा वापर केला जातो. या जलवाहिन्यांची लांबी सुमारे ४५० मि.मी. असून सुमारे २७ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. या जलवितरण जाळ्यास द्वितीय स्तर वहन व्यवस्था म्हणतात.
विशेष म्हणजे जलाशयातू वाहिनी व वाहिनीच्याद्वारे पाणी विविध परिसरातील ग्राहकांपर्यंत सुमारे ३ लाख ६० हजार जलजोडण्यांद्वारे पोहोचविले जाते. या संपूर्ण प्रणालीला तृतीय स्तर प्रणाली म्हणतात. यामध्ये २४०० मि.मी. ते १५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांचा समावेश आहे. तृतीय प्रणालीच्या जाळ्यांची अंदाजीत लांबी सुमारे ५००० कि.मी. आहे. व त्यामध्ये सुमारे २५ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. मुंबईतील दररोजचा पाणीपुरवठा सुरळीत राहणेसाठी सुमारे १००० झडपांची उघडझाप केली जाते. महत्त्वाचे म्हणजे मुंबईकरंना, मुंबई शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी दररोज सुमारे ११५० अभियंते व ८९५० कामगार व इतर कर्मचारीवर्ग कार्य करत असतात आणि म्हणून मुंबईला पाणीपुरवठा होतो.