Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडी'वंदे भारत एक्सप्रेस'ला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

‘वंदे भारत एक्सप्रेस’ला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबईकरांसाठी आजपासून नियमित रुपात धावणार

गांधीनगर (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदींनी सकाळी १०.३० वाजता गांधीनगर रेल्वे स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधानांनी गांधीनगर ते कालुपूर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेने प्रवास केला. यादरम्यान ते लोकांशी बोलतानाही दिसले. मुंबईकरांसाठी पहिली वंदे भारत एक्सप्रेस शनिवारपासून (दि. १ ऑक्टोबरपासून) नियमित रूपात सुरू होणार आहे.

ही एक्स्प्रेस भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन आहे. ‘ही ट्रेन विमानाच्या तुलनेत १०० पट कमी आवाज करते. या ट्रेनचा अनुभव घेतल्यानंतर ज्यांना विमानाने प्रवास करायची सवय आहे ते लोक या ट्रेनला प्राध्यान्य देतील’, असा दावा या ट्रेनच्या लोकार्पण सोहळ्यात अहमदाबादेत पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. गांधीनगर ते अहमदाबाद प्रवास करत मोदींनी प्रवासाचा आनंदही लुटला.

गांधीनगर आणि अहमदाबाद या जुळ्या शहरांचा विकास एक उत्तम उदाहरण आहे. याच मॉडेलप्रमाणे गुजरातमधील जुळ्या शहरांचा विकास केला जात आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. आत्तापर्यंत लोक न्यूयॉर्क, न्यू जर्सीबाबत बोलायचे. मात्र, आता या शर्यतीत माझा भारत देशदेखील मागे नाही, असे गौरवोद्गार यावेळी मोदी यांनी काढले. या सोहळ्यात बोलताना मोदींनी विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ‘नववी ते बारावी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मेट्रोच्या कामांबाबत विचारले पाहिजे. त्यासाठी लागणारा खर्च, बोगद्यांचे बांधकाम याविषयी त्यांना प्रश्न पडले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना जबाबदारीचे भान तर राहणारच, शिवाय सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलनांमध्ये ते सहभाग घेणार नाहीत. अशाप्रकारे नुकसान झाल्यास स्वत:च्या मालमत्तेचे नुकसान झाल्यासारखा त्यांना त्रास होईल’, असे मोदी यावेळी म्हणाले.

‘वंदे भारत’ एक्सप्रेसमध्ये एकूण १ हजार १२८ प्रवासी क्षमता आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर धावली. त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली होती.

वेळ : मुंबई सेंट्रल वरून ही गाडी दररोज सकाळी ६.१० वाजता सुटेल आणि गांधी नगर स्थानकात दुपारी १२.३० पर्यंत पोचेल, तर त्याच दिवशी दुपारी गांधी नगर येथून २.०५ ला सुटून संध्याकाळी ८.३५ ला मुंबई सेंट्रल स्थानकात पोचेल.

तिकीट दर : मुंबई-अहमदाबाद चेअर कारसाठी (सीसी) १३८५ रुपये आणि एक्झिकेटिव्ह कारसाठी (ईसी) २५०५ रुपये असे तिकीट दर आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -