भाईंदर (वार्ताहर) : शासनाची बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची विक्री करत असल्याचे सांगून दमदाटी करून प्रकरण मिटविण्यासाठी २५ हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका महिलेसह चार जणांच्या तोतया पत्रकारांच्या टोळीला अटक केली आहे.
भाईंदर पश्चिमेला नवकार ट्रेडिंग नावाने वृषभ गांधी यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात एक महिला आणि तीन जण आले. आणि तुम्ही शासनाची बंदी असलेली प्लास्टिक वस्तू विकत आहेत, तुम्हाला दंड भरावा लागेल, असे सांगत दमदाटी केली. त्यातील महिलेने ११२ या टोल-फ्री क्रमांकावर फोन केला आणि पोलिसांना बोलावले.
पोलसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेले. सदर प्रकरण मिटविण्यासाठी टोळीतील धीरज दुबे आहे २५ हजारांची मागणी केली. भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील, योगेश टिळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर व त्यांच्या पथकाने तोतया पत्रकार धीरज दुबे, अशोक कुमार मिश्रा, केसर उदय भानसिंह आणि कविता यादव यांना अटक केली आहे.