नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी ३ निर्णय घेण्यात आले. यामध्ये सोलर पीव्हीसाठी पीएलआय योजनेचा विस्तार करणे, सेमीकंडक्टर उत्पादनाच्या तीन योजनांमध्ये ५० टक्के सवलत देणे आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणालाही मंजुरी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारने सौर पीव्ही मॉड्यूल ट्रान्स-२ साठी पीएलआय योजनेला मान्यता दिली आहे. त्यासाठी १९ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशात सौर पॅनेल निर्मितीला चालना मिळणार आहे.
सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासासाठी मंत्रिमंडळाने सुधारणांना मंजुरी दिली आहे. तंत्रज्ञान नोड्स तसेच कंपाऊंड सेमीकंडक्टर, पॅकेजिंग आणि इतर सेमीकंडक्टर सुविधांसाठी ५० टक्के प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे २ लाख लोकांना प्रत्यक्ष आणि ८ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे ते म्हणाले.