उरण (वार्ताहर) : मध्यप्रदेश, इंदौर येथे झालेल्या ७ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या तीन स्पर्धकांनी ९ सुवर्ण पदकांची कमाई केली. या तीनही यशस्वी स्पर्धकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संयुक्त भारतीय खेल फाउंडेशनच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील इंदौर येथे ७ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १७ ते १९ सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये अॅथलेटिक्स, जलतरण, व्हॉलीबॉल, कबड्डी, तायक्वांदो, कराटे, मार्शल आर्ट, योगा, चेस, कॅरम, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेबलटेनिस, स्केटिंग, लॉन टेनिस, आरचारी, हॅन्डबॉल, बॉक्सिंग, रेसलिंग, लिफ्टिंग, बॉडिबिल्डिंग या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. जलतरण स्पर्धेमध्ये उरणमधील हितेश जगन्नाथ भोईर, आर्यन विरेश मोडखरकर आणि जयदीप सिंग यांनी सहभाग घेतला होता.
गोल्डन इंटरनॅशनल स्कूलच्या जलतरण तलावामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये आर्यन मोडखरकर याने ५० मी. बटरफ्लाय स्ट्रोक, ५० मी. फ्रिस्टाईल आणि १०० मी. फ्रिस्टाईल यात सुवर्ण पदकांची कमाई केली. हितेश भोईर याने ५० मी. फ्रिस्टाईल, १०० मी. फ्रिस्टाईल आणि १०० मी. बॅक्स्ट्रोक या प्रकारांमध्ये सुवर्ण पदक जिंकले. जयदीप सिंगनेही ५० मी. फ्रिस्टाईल, ५० ब्रेस्टस्ट्रोक, १०० ब्रेस्टस्ट्रोक या तीन प्रकारांत सुवर्ण पदक पटकावले.