डॉ. सर्वेश सोमण
आपण सांगितल्याप्रमाणे निर्देशांकांनी या मागील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी मोठी तेजी दाखवली. आपण आपल्या मागील लेखात सांगितल्याप्रमाणे निर्देशांकाची दिशा आणि गती तेजीची होती. त्यामुळे जोपर्यंत निर्देशांक निफ्टीची १७५०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकांतील तेजी कायम राहील हे सांगितलेले होते. आपण सांगितल्याप्रमाणे मागील आठवड्यात हालचाल झाली. आपण आपल्या मागील लेखात टेक्निकल अॅनालिसिसनुसार मध्यम मुदतीच्या चार्टनुसार “टाटा इन्व्हेस्ट” या शेअरने १७३४ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली आहे. त्यामुळे या शेअरमध्ये पुढील काळात अल्पमुदतीत चांगली वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आज १८२८ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये १५०० रुपये किमतीचा बंद पद्धतीने स्टॉपलॉस ठेवून तेजीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल हे सांगितलेले होते. त्याप्रमाणे “टाटा इन्व्हेस्ट” या शेअरने आठवड्याच्या पहिल्या ३ दिवसांतच फार मोठी वाढ दाखवत २८८३ हा नवीन उच्चांक नोंदविला. टक्केवारीत पाहावयाचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर केवळ एका आठवड्यात या शेअरने ५८ टक्क्यांची घसघशीत वाढ दिलेली आहे.
दीर्घमुदतीची गुंतवणूक शेअर बाजारात नेहमीच उत्तम फायदा मिळवून देत आलेली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मूळ भांडवलापैकी, दीर्घमुदतीसाठी फार मोठी गुंतवणूक करणे घाईचे ठरू शकते. त्यामुळे दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणूकदारांनी निर्देशांकांच्या पुढील घसरणीत टेक्निकल आणि फंडामेंटल अशा दोन्ही बाबतीत चांगल्या कंपन्या टप्प्याटप्प्यानेच खरेदी करण्याचे धोरण ठेवणे योग्य ठरेल. अल्प तसेच मध्यम मुदतीचा विचार करता टेक्निकल बाबतीत तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये स्टॉपलॉसचा वापर करूनच गुंतवणूक करावी. शेअर बाजारात बऱ्याच वेळा गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा उपयोग करताना दिसून येत नाही. परिणामी होत असलेल्या तोट्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते.
पुढील काळात स्टॉपलॉसचा वापर टाळणे ही मोठी चूक ठरू शकते. याला कारण ज्यावेळी फंडामेंटल बाबतीत निर्देशांक महाग झालेले असतात, त्यावेळी निर्देशांकात होणाऱ्या घसरणीच्या तुलनेत शेअर्समध्ये होणारी घसरण ही फार मोठी असते. त्यामुळे गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस अत्यंत आवश्यक आहे. पुढील आठवड्याचा विचार करता शेवटच्या सत्रात झालेल्या नफा वसुलीनंतर निर्देशांक निफ्टी काही आठवडे पुन्हा एकदा रेंज बाऊंड राहू शकते. चार्टचा विचार करता निफ्टी पुढील काळात १७५०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे जोपर्यंत ही पातळी तुटत नाही तोपर्यंत निर्देशांकात बाऊन्स होऊ शकतो. मात्र जर ही पातळी तुटली तर मात्र निर्देशांक निफ्टीमध्ये आणखी १०० ते १५० अंकांची घसरण होऊ शकते. पुढील आठवड्याचा विचार करता १८००० ही विक्रीची पातळी असून जोपर्यंत निफ्टी ही पातळी ओलांडत नाही तोपर्यंत नवीन मोठी तेजी येणार नाही. निर्देशांक देत असलेले संकेत पाहता सध्या शांत राहून नवीन खरेदी टाळणे हेच हिताचे ठरेल. कमोडीटी मार्केटचा विचार करता टेक्निकल अॅनालिसिसनुसार या सोन्याची दिशा आणि गती ही अल्पमुदतीसाठी मंदीची आहे. आता सोन्याची ४९००० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे जोपर्यंत सोने या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोने बाऊन्स करू शकते. अल्पमुदतीचा विचार करता ५०७०० ही सोन्याची विक्रीची पातळी असून जोपर्यंत सोने ही पातळी तोडून स्थिरावत नाही तोपर्यंत सोन्यात मोठी तेजी येणार नाही. आपण यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे टेक्निकल चार्टनुसार कच्चे तेलाची दिशा आणि गती ही मंदीची असून कच्चा तेलाने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार ६८०० ही पातळी तोडत मंदी सांगणारी रचना यापूर्वीच केलेली आहे. मागील आठवड्यात कच्च्या तेलाने बाऊन्स बॅक केला असला तरी ही विक्रीची उत्तम संधी आहे. सध्या कच्या तेलाची दिशा मंदीची असल्याने यामध्ये तेजीचा व्यवहार करू नये.