सीमा दाते
मुंबई महानगरपालिका अशी महापालिका आहे की, सगळ्याच पक्षाचा आपला विजयाचा झेंडा या महापालिकेवर फडकवण्यासाठी प्रखर प्रयत्न सुरू असतात. सध्या मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त केले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कारभार राज्य सरकारकडून पहिला जातो आहे. म्हणूनच नव्याने आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिकेवरही लक्ष आहे. मुंबईतील समस्या, महापालिकेतील उपाययोजना या सगळ्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियुक्त झाल्यानंतर काहीच दिवसांत मोठा पाऊस झाला होता आणि यावेळी स्वत: मुख्यमंत्री शिंदे महापालिकेतील यंत्रणा पाहण्यासाठी गेले होते. मुंबईत दरवेळी पाणी साचण्याची समस्या आणि त्यावरील तोडगे त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून समजून घेतले. त्यानंतर मुंबईकरांना या समस्यांपासून कसे सोडवता येईल हेही त्यांनी पाहिले, इतकेच नाही तर मुंबईतील रस्त्यांच्या समस्यांवरही त्यांनी उपाययोजना केल्या आहेत. रस्ता सुधारणा कामाचा आढावा देखील स्वत: त्यांनी घेतला आहे. मुंबईकरांना कसे खड्डेमुक्त रस्ते मिळतील यासाठीचे मोठेमोठे निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतले आहेत.
दरम्यान येत्या दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डेमुक्त कशी होईल यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुंबईत आता रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग आला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते लवकर पूर्ण होतील, असा विश्वास पालिकेने दिला आहे. सन २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण काम होत आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तर आणखी तब्बल ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर उर्वरित ४२३.५१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण देखील पुढच्याच वर्षी म्हणजे २०२३-२०२४ मध्ये हाती घेण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
मुंबईतील रस्ते सुविधा दिल्यानंतर मुंबई आणखी आकर्षक कशी वाटेल, मुंबईचा दर्जा कसा उंचावेल याकडे देखील शिंदे सरकार लक्ष देत आहे. नुकतेच पालिका आयुक्तांनी मुंबईतील सुशोभीकरणाच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला आहे आणि त्यानंतर मुंबईतील सुशोभीकरणाची अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे लवकरच मुंबई चकाचक होणार आहे. या सुशोभीकरणाची पन्नास टक्के कामे डिसेंबरच्या अखेरपर्यंत, तर उरलेली कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.
या कामात रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे हाती घेतली जाणार आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे रस्ते सुस्थितीत करणे. त्यावरील झेब्रा क्रॉसिंग सुस्पष्टपणे दिसतील अशी करणे, तर रस्ते दुभाजकांमधील मोकळ्या जागेत सुशोभित फुलझाडांची, हिरवळीची लागवड करणार आहेत.
मुंबईतील पदपंथाचे देखील आता सुशोभीकरण होणार आहे. त्यात स्टॅम्प काँक्रीट, आकर्षक विद्युत दिवे, अतिरिक्त जागेत शोभिवंत कुंड्या लावल्या जाणार आहेत. दुसरीकडे मुंबईतील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या अडगळीमुळे मुंबईचे सौंदर्य हरवते, अशा उड्डाणपुलाखाली देखील टाकाऊ साहित्य हटवून स्थानिक नागरिकांना विरंगुळा मिळेल, मुलांना खेळता येईल, आबालवृद्धांना चालता येईल, अशा रीतीने क्षेत्र निर्माण करावे. या सर्व जागा सौंदर्यात्मक पद्धतीने विकसित करणार आहेत. त्यानंतर मुंबईची खरी ओळख असलेले मुंबईतील समुद्रकिनारे, देखील सुशोभीत केले जाणार आहेत. मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करणे गरजेचे आहे. ते स्वच्छ करून त्यावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे, तर मुंबईतील स्कायवॉक हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. या स्कायवॉकवरही आता स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्युत योजनेची कामे केली जाणार आहेत. मुंबईतील उद्यानांमध्ये सायंकाळी उशिरा अथवा रात्रीच्या वेळेस जाण्यासाठी सुरक्षित असावी म्हणून पुरेशी प्रकाश योजना करणात येणार आहे व उद्यानांमध्ये प्रकाशित पदपथ, कारंजे उभारले जाणार आहेत.
एकूणच काय तर पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ पर्यंत मुंबईचे रूपडेच पालटणार आहे. विशेष म्हणजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: लक्ष घालत आहेत, जसे महापालिकेवर त्याचे लक्ष आहे तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीवरही शिंदे गटाचे लक्ष आहे आणि म्हणूनच दसरा मेळावा हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी महत्त्वाचा आहे. यंदा मुंबई शिवसेनेची आहे असे म्हटले तरी शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे.
एका बाजूला शिंदे गट आणि भाजप एकत्र, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना एकटी उभी आहे, जरी शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला तरी शिवसेनेला ही निवडणूक आव्हानात्मकच असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिकेच्या शिंदे गटाला कसे जाता येईल यासाठी शिंदे गट आता चांगलचे कामाला लागले आहे, त्यामुळे आतापासूनच मुंबईकरांच्या मनात शिंदे गट रुजवणे सुरू आहे, त्याची सुरुवात शिंदे गटाने शाखा सुरू करून देखील केल्या आहेतच. आता महापालिका निवडणुकीत बघणे महत्त्वाचे असणार आहे. ते म्हणजे शिवसेना आणि शिंदे गट समोरासमोर निवडणूक लढणार आहेत.