देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशाच्या कानाकोपऱ्यांत भारतीयांनी उत्साहात साजरा केला. एकेकाळी गुजरातपुरते सीमित असणारे नरेंद्र मोदी हे नेतृत्व आज देशातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यांत परिचित आहे. एप्रिल २०१४ नंतर पंतप्रधानपदावरून देशाची धुरा सांभाळताना मोदी यांनी देशाचा जागतिक पातळीवर खऱ्या अर्थांने दरारा वाढविला आहे. देशाची आदरयुक्त भीती जगभरात निर्माण करणे नरेंद्र मोदी या नेतृत्वामुळे निर्माण झालेली आहे. २०१४ सालापासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आढावा घेतल्यास ‘ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले’ असे म्हणणेही अतिशयोक्तीचे ठरणार नाही. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचा देशाचे ‘लोहपुरुष’ असा उल्लेख होत होता. पण आजमितीला जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी यांचा भारताचे लोहपुरुष असा होऊ लागला आहे. मोदी पंतप्रधानपदी विराजमान होण्यापूर्वी जागतिक पातळीवर भारताच्या अस्तित्वाला किंमत होती; परंतु पाहिजे तो मानसन्मान व दरारा प्राप्त करून देण्यास त्या त्या तत्कालीन नेतृत्वाला मर्यादा पडल्या होत्या. आपल्या शेजारील अगदी लिंबूटिंबू देशही आपल्यावर कुरघोड्या करण्यात व्यस्त राहून वेळप्रसंगी आपल्यावर डोळे वटारण्याचे धाडस दाखवत होते. दररोज सीमेपलीकडून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी भारत जणू काही त्यांचे माहेर असल्यागत सीमा ओंलाडून देशामध्ये दहशतवादी कारवाया करून पुन्हा पाकिस्तानात निर्धास्त जात होते. चीनच्या कुरघोड्याही वाढत होत्या आणि आपल्या भूभागावर त्यांनी अतिक्रमणही सुरू केले होते.
पण आजचे चित्र वेगळेच आहे. मोदींनी देशाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी या सर्व परिस्थितीचा अभ्यास केला होता. त्यांच्या एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वापरलेली ‘अच्छे दिन आयेंगे’ ही टॅगलाइन देशाच्या सीमारेषांच्या सुरक्षेबाबत सार्थ झालेली पाहावयास मिळत आहे. देशाच्या सीमारेषा आता पूर्णपणे सुरक्षित झालेल्या आहेत. लष्कराने मोदी काळात केलेली ‘सर्जिकल स्ट्राइक’ ही शेजारील सर्वच देशांना दिलेली एक चपराक होती. आजवर तुम्ही आमच्या देशात पाहिजे तेव्हा घुसखोरी करून आमचे नुकसान करत होते, पण ते दिवस इतिहासजमा झाले. आता आगळीक केलीच तर तुमच्या भागात घुसून तुमचेच दात तुमच्या घशात घालू शकतो, असा इशारा मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने दिला आहे. केवळ सीमारेषाच नाही तर देशाच्या सभोवताली असणाऱ्या सागरी सीमांवरही आज देशाचा दरारा निर्माण झालेला आहे. जगात भारतात दरारा वाढवत असताना भारतीय राजकारणात वर्षानुवर्षे कार्यरत असणाऱ्या अपप्रवृत्तींना लगाम घालण्याचे काम मोदी राजवटीत घडले आहे. अनेक भ्रष्टाचारी आज तुरुंगात खितपत पडले आहेत.
मोदींनी नुकत्याच तीनदिवसीय युरोप दौऱ्यावर असताना ‘‘ही युद्धाची वेळ नव्हे’’ असा सल्ला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दिला. सध्या जगासमोर अन्नधान्य, खते आणि इंधन टंचाई या सर्वात मोठ्या समस्या आहेत, असेही मोदी यांनी पुतिन यांच्या निदर्शनास आणले. रशियाला असा सल्ला देण्याचे धाडस कोणीही दाखविले नव्हते, ते मोदी यांनी करून दाखविले. भारताने आजवर कधीही हिसेंचे समर्थन केले नाही. सतत तटस्थपणे राहत कोणाचीही बाजू घेतलेली नव्हती. पण हे करताना युद्धाला पोषक वातावरणनिर्मिती करणाऱ्या देशांना सुनावण्याचे धाडस कोणी दाखविले नव्हते. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोप दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) २२वी वार्षिक परिषद येथे झाली. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधानांनी युक्रेन युद्धाबाबत चिंता व्यक्त केली. ‘आपण युद्धाबाबत दूरध्वनीवरही चर्चा केली आहे. आता शांततेच्या मार्गाने तोडगा कसा काढता येईल, यावर चर्चा करण्याची संधी प्रत्यक्ष भेटीमुळे मिळाली,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावर, ‘युद्धाबाबतची तुमची चिंता मी समजू शकतो. युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आमचीही इच्छा आहे. मात्र युक्रेनने चर्चेत रस दाखवलेला नाही,’ असे पुतिन यांनी मोदींना सांगितले. रशियाचे अध्यक्ष पुतिन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांचे प्रमुख या वार्षिक परिषदेत सहभागी झाले आहेत. युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भात भारताने अद्याप रशियाबद्दल निषेधाचा सूर काढलेला नाही.
मात्र या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी भारताची युद्धविरोधी भूमिका स्पष्ट केली. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनीही पुतिन यांच्याकडे अशीच चिंता व्यक्त केली होती. केवळ रशियाला युद्धाबाबत सुनावण्याइतपत मोदी सीमित न राहता त्यांनी पुतिन यांच्याशी चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेत कोरोना महासाथीनंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. भारताच्या आर्थिक विकासाचा संदर्भ देऊन मोदींनी सांगितले की, भारत जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचे आव्हान सध्या जगासमोर आहे. भारताचा आर्थिक विकास दर ७.५ टक्के असून तो भविष्यात जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपेक्षा अधिक असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांच्या नेतृत्वाकडून देशवासीयांना खूप अपेक्षा आहेत आणि आशा आहेत. त्या अपेक्षा आणि आशांची पूर्तता करण्यास मोदींचे नेतृत्व निश्चितच सक्षम आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाची धुरा मोदींना सांभाळायची आहे. मोदी त्या निश्चितच पूर्ण करतील.