मुंबई : राज्यातील गडकिल्ल्यांची फार दुरावस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी आज मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
आंदोलक सीएसएमटी येथून मंत्रालयाकडे रवाना झाले. मात्र, या आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पहाटेपासून या आंदोलनासाठी राज्यभरातून शिवप्रेमी जमायला सुरुवात झाली होती. सुमारे पाचशे आंदोलक सध्या मंत्रायलयाच्या दिशेने कूच करत आहेत. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना अडवले आहे.
दरम्यान, आंदोलकांनी मंत्रालयाच्या दिशेने आगेकूच करत असताना पोलिसांनी आंदोलकांचा फौजफाटा थांबवला आहे. मंत्र्यांच्या बंगल्याला गडकिल्ल्यांचे नाव दिले आहेत पण संवर्धन जबाबदारीने का केले जात नाही असा सवाल गडप्रेमींनी केली आहे. तुम्हाला संवर्धन करता येत नसेल तर मंत्र्यांच्या बंगल्याला ही नावे का दिली आहेत असा सवाल आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे. पोलिसांकडून आदोलकांना थांबवण्यात आले असून आंदोलकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.