मुंबई : सचिवांना देण्यात आलेले विशेष अधिकार शिंदे फडणवीस सरकारने आता संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे सरकारच्या कामाचा वेग वाढण्याची शक्यता अधिकारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तार उशिरा झाल्याने सचिवांना विशेष अधिकार सरकारकडून देण्यात आले होते. कोणत्याही खात्याचे काम अडून राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने आणि खातेवाटप पूर्ण झाल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ४ ऑगस्टला शिंदे फडणवीस सरकारने काही अधिकार हे सचिवांना बहाल केले होते. त्यामुळे मंत्रालयाचे सचिवालय झाल्याची टीकाही सरकारवर करण्यात आली होती. अखेर सचिवांकडील हेच अधिकार संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बहाल करण्यात आल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.