भास्कर सोनवणे
इगतपुरी : काळा फळा अन पांढरा खडू; जीवघेण्या खेळाने विद्यार्थी लागले रडू… खैरेवाडीच्या विद्यार्थ्यांचा तीन नदीपात्रे ओलांडून शाळेसाठी जीवघेणा खेळ अशी परिस्थिती इगतपुरी तालुक्यामध्ये दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना किती हाल सहन करावे लागतात हे देखील यातून समोर येत आहे; परंतु निगरगट्ट प्रशासनाला मात्र याकडे बघायला वेळ नाही.
मागील काही महिन्यापूर्वी याच इगतपुरी तालुक्यात महिलांना हंडाभर पाण्यासाठी कशी कसरत करावी लागते. याचे दृश्य समोर आले होते. त्यानंतर तातडीने माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून पूल बनवून दिला; परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने जो पूल बांधला तो इतका नाजूक होता की, पहिल्या पावसामध्ये पूर आला आणि तो पूलही वाहून गेला अशी परिस्थिती होती. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला दर्जेदार पूल बांधण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. आता या गावातील महिलांना पावसाळा संपण्याची वाट बघावी लागणार आहे.
त्यानंतरच हा पूल होतो की नाही हे येणारा काळ ठरवेल; परंतु हे कमी होते की काय? आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी किती हाल सहन करावे लागतात हे देखील दाखविणारे उदाहरण याचा इगतपुरी तालुक्यातून समोर येत आहे. वास्तविकरीत्या बघायला गेले तर इगतपुरी हा तालुका हा नाशिक मुंबई महामार्गावर असणारा तालुका आहे. परंतु ज्या पद्धतीने प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक होते त्या पद्धतीने या परिसरात लक्ष नसल्याच्या अनेक घटना समोर येत आहे.
इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील पहिली ते दहावीचे २० ते ३० विद्यार्थी शिक्षणासाठी मोठा खडतर सामना करीत आहेत. शाळेत जाण्यासाठी रोज विहिराचा ओहळ, जूनवणेचा ओहळ, देवीचा ओहळ अशी नदीची तीन पात्रे पार केली जातात. त्यानंतर उघडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्यासाठी जावे लागत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदीला जास्त पूर आला. शाळेत गेलेली सर्व मुले अडकून पडली. त्यामुळे या सर्व मुलाना पालकांनी उचलून जीवावर खेळून नदी पार केली. हा नदी पार करतानाचा व्हीडिओ समोर आला आहे. नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या ठिकाणी तत्काळ पूल बांधून येण्याजाण्याची सुविधा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.