ठाणे (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून संध्याकाळच्या पावसाने घातलेला धुमाकूळ आणि सूरू असलेले पितृपक्ष यांच्यामुळे शहरातील बाजारपेठा थंडावल्या आहेत. दरम्यान गणेशोत्सव संपल्यानंतर व्यापारी वर्गाला नवरात्रीचे वेध लागले असून नवरात्र सुरू झाले की, पुन्हा एकदा बाजारपेठा गर्दीने फुलतील, असा विश्वास व्यापारी वर्ग व्यक्त करत आहेत.
आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा पंधरवडा म्हणजे पितृपक्ष सुरू झाला आहे. पितृपक्षा दरम्यान शुभकार्य करू नये, अशी समजूत आहे. या पितृपक्षाचा परिणाम बाजारपेठेवर दिसू लागला आहे. अनेक नागरिकांनी वस्तू खरेदी करणे कमी केल्याने बाजारपेठांमधील आर्थिक उलाढाल काही प्रमाणात मंदावली आहे. पितरांना शांती लाभावी, यासाठी त्यांना आवाहनाद्वारे पिंडदान, खीरदान, तसेच ब्राह्मण भोजन आदी कर्मे केल्याने पितरांचा आशिर्वाद मिळतो, अशी श्रद्धा असल्याने भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात घरोघरी श्राद्धकर्म करण्याची प्रथा आहे.
यावर्षी शनिवारी पौर्णिमेचे व प्रथम तिथीचे श्राद्ध झाले. यात चतुर्थीला भरणी, अविधवा नवमी, अमावास्येला सर्वपक्षी श्राद्ध अशा विशेष दिवसांतही पितरांच्या नावाने तर्पण केले जाते. पितरांच्या नावाने पिंडदान करून त्यावर पाणी सोडून त्यांची आठवण केली जाते. या पंधरवड्यात पितर पृथ्वीवर येतात आणि पिंडाच्या प्रसादाने संतुष्ट होतात, तसेच आपल्या वारसांना आशीर्वाद देऊन जातात, असे मानले जाते. त्यानुसार घरोघरी १५ दिवस तिथीनुसार पक्ष, श्राद्ध आदी विधी केले जातात. नैवेद्य काकस्पर्शाच्या रूपाने तो पितरांना दिला जात आहे.
पितृ पंधरवडा शुभच!
पितृ पंधरवडा हा पितरांच्या श्राद्धकर्माचा पक्ष असल्याने तो अशुभ असल्याचे मानले जाते. या १५ दिवसांत घरात शुभ कार्य, तसेच कोणत्याही नव्या कार्याला सुरुवात केली जात नाही. या काळात फक्त पितरांचे स्मरण करावे, असे मानले जाते. मात्र, पंचांगकर्त्यांच्या मते हा पंधरवडा शुभ असून, आपली नैमित्तिक कामे केली तरी चालतात. तर आपली पितरं पृथ्वीवर आल्याची समजूत असल्याने, त्यांच्या उपस्थितीत शुभ कार्ये उरकून घ्यावीत असा देखील काहींचा मतप्रवाह आहे.