Tuesday, March 18, 2025
Homeदेशआरएसएसच्या दसरा मेळाव्यात प्रथम प्रमुख पाहुण्या असणार महिला

आरएसएसच्या दसरा मेळाव्यात प्रथम प्रमुख पाहुण्या असणार महिला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी नागपुरात संघ मुख्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात संतोष यादव यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. संघाच्या दसरा कार्यक्रमात एखादी महिला ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महिला मतदारांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी संघाने उचललेले हे पाऊल असल्याची सध्या चर्चा आहे.

संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संघटनेच्या बैठकीत महिलांचा सहभाग तुलनेने कमी असल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. या दरम्यान आता संघाच्या वार्षिक दसरा सोहळ्यात गिर्यारोहक संतोष यादव या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे आरएसएसने जाहीर केले आहे.

खरे पाहता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा ही पुरुषांची संघटना अशी आहे. या प्रतिमेमुळे अनेक राजकीय पक्षांकडून संघावर टीकादेखील केली जाते. अशा परिस्थितीत ही प्रतिमा बदलण्यासाठी संतोष यादव यांना आरएसएसच्या दसरा कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर कुटुंब आणि समाजातील मूल्यांचा प्रसार करणे हा संघाच्या कुटुंब प्रबोधन कार्यक्रमाचा उद्देश आहे.

त्यावर संघाने नव्याने लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती आहे. १९३६ पासून संघाची ‘राष्ट्र सेविका समिती’ नावाची शाखा असली, तरी त्यात महिला मुख्य गतिविधींचा भाग नाहीत. त्यामुळे संघाची ओळख, पुरुषांची संघटना म्हणून केली जाते. अशा स्थितीत गिर्यारोहक संतोष यादव संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर संघ आपल्या प्रतिमेत बदल घडवू इच्छित असल्याचे मानले जात आहे.

कोण आहेत संतोष यादव?

संतोष यादव या मूळच्या हरियाणाच्या आहेच. त्या एक अतिशय प्रतिभावान गिर्यारोहक आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, माऊंट एव्हरेस्ट हे शिखर दोनदा सर करणारी त्या पहिल्या महिला आहेत. सन २००० मध्ये संतोष यादव यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -