नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भटका कुत्रा चावलेल्या व्यक्तींवर सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार केले जावेत, असे आदेश केरळ उच्च न्यायलयाने दिले आहेत. या संदर्भातील आदेश केरळमधील सर्व सरकारी रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
प्राण्यांच्या अधिकारांच्या हक्कांसंदर्भात सरकारी पातळीवर होत असलेल्या अनास्थेबद्दल केरळ उच्च न्यायालयात ही जनहित याचिका सुरू आहे. उच्च न्यायालयाने स्वेच्छेने ही याचिका सुरू केली आहे. ज्या कुत्र्यांना रेबिज असल्याचा संशय आहे, त्यांना भूल देऊन, पडकण्यात यावे असे आदेशही न्यायलयाने दिले आहेत. ए. के. जयशंकर नंबियार आणि गोपिनाथ पी यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.
यापूर्वी प्राण्यासंदर्भात नागरिकांनी कायदा हातात घेऊ नयेत, असे आदेश देण्यात आले होते. तशा प्रकारचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच जी कुत्री आक्रमक आहेत, त्यांच्यावर नियंत्रण राज्य सरकार कशा प्रकारे ठेवणार आहे, याची विचारणाही न्यायालयाने केली होती.
राज्यात अॅनिमल शेल्टर सुरू करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या जनहित याचिकेवर आवश्यक असेपर्यंत प्रत्येक आठवड्याला सुनावणी होणार आहे.