मुंबई (वार्ताहर) : मध्य रेल्वेवर शुक्रवारी स्वच्छता पंधरवडा साजरा करायला सुरुवात झाली. २ ऑक्टोबरपर्यंत हा पंधरवडा चालणार आहे.
मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेचे प्रधान विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वच्छता प्रतिज्ञा दिली. दि. १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेवर स्वच्छता पंधरवडा पाळला जाणार आहे. ज्यामुळे रेल्वे स्थानके, ट्रेन, कार्यालये, वसाहती, कार्यशाळा, देखभाल डेपो, रुग्णालये इत्यादी ठिकाणी स्वच्छतेत सुधारणा दिसून येईल.
मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि सर्व विभागांचे रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वच्छतेसाठी वचनबद्धतेची आणि स्वच्छतेसाठी वर्षातून १०० तास म्हणजे आठवड्यातून दोन तास स्वत:, कुटुंब, परिसर, गाव आणि कामाच्या ठिकाणी पुढाकार घेऊन स्वेच्छेने स्वच्छतेचे कार्य करण्यासाठी, एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात जनजागृती, प्लास्टिकचा कमीत कमी वापर आणि पुढाकार घेण्याची प्रतिज्ञा घेतली.
विविध कार्यालये, युनिट्स आणि डेपो येथे श्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.