सुभाष म्हात्रे
अलिबाग : वडखळ-अलिबाग या २५ किलोमीटर लांबीच्या (१६६- ए) राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या संरक्षक कठड्यांना वाहने धडकून कठड्यांची झालेली मोडतोड, मोऱ्यांची झालेली दुरवस्था, झाडीत पडलेले दिशादर्शक फलक, वाढलेली झाडीझुडपे, मार्गाला पडलेल्या भेगा, अरुंद रस्ता आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने या महामार्गावरील दिवसेंदिवस अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रायगड जिल्ह्याची राजधानी म्हणून अलिबागकडे पाहिले जात असले, तरी ऐतिहासिक, सामाजिक, पर्यटनदृष्ट्याही अलिबागची ओळख आहे. त्यामुळे पर्यटकांसह विविध कामांसाठी बाहेरून येणारी वाहने, एसटी महामंडळाच्या बसेसच्या दररोजच्या फेऱ्या, सहलीसाठी येणाऱ्या बसेस, गेलचा उसरला गॅस प्रकल्प असल्याने बाहेरून गॅस घेऊन येणारे ट्रेलरची या महामार्गावर सततची वर्दळ असते. त्या दृष्टीने या महामार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरणासह उंचीकरण होणे गरजेचे असतानाही, त्याकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस या महामार्गावरिल अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर घेऊन येजा करणाऱ्या ट्रकांचे गेल्या काही वर्षात सर्वाधिक अपघात झाले आहेत. अरुंद रस्त्यामुळे १० सप्टेंबरला मध्यरात्री याच महामार्गावरिल खंडाळे गाव हद्दीतील रस्त्यालगतच्या घर परिसरात मालवाहू ट्रक घुसला होता. सुदैवाने या अपघातात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र घरांचे मोठे नुकसान झाले. कार्लेखिंडीच्या उतरणीवरील सागाव गावाजवळ गॅस घेऊन उसर बाजुकडे निघालेला ट्रेलर आडवा झाला होता. याच गावाच्या उतरणीवर महामार्गालगत असलेल्या दुकानातही दोनवेळा मालवाहू ट्रक घुसले होते. राऊत वाडीच्या वळणावरही काही वर्षापूर्वी लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात होऊन एक कर्मचारी या लोखंडी सळ्यांखाली दबला जाऊन त्याचा मृत्यू झाला होता.
कार्लेखिंड पेट्रोल पंपाच्या पुढील वळणावरही पिकअप व्हॅनला अपघात होऊन काहीजण दगावले होते. पोयनाड पोलीस ठाण्याच्या शहाबाज गावाच्या हद्दीतही बरेच अपघात झाले आहेत. मात्र अजूनही स्थानिक आमदार, रायगडचे खासदार, जिल्हा प्रशासनासह संबंधित विभागाचे अधिकारी जागे झालेले नाहीत. पूर्वी हा रस्ता राज्य सरकारकडे असल्याने त्याची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती व्हायची. मात्र रुंदीकरणाचा विचार कधीच या विभागाकडून झाला नाही. या मार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय झाल्यानंतर हा मार्ग राज्य सरकारने केंद्राकडे हस्तांतरित केला होता. या मार्गाचे चौपदरीकरण होणार होते; परंतू भूसंपादनासाठी लागणारी मोठी रक्कम देण्यास केंद्र सरकार तयार नसल्याने दुपदरीकरणाचा प्रस्ताव पुढे आला. परंतू तोही प्रस्ताव बारगळला. त्यानंतर केंद्राने हा मार्ग परत राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न केला; परंतू राज्य सरकारने केंद्राकडून हस्तांतरित करून घेण्यास नकार दिल्याने आता या मार्गाचे नूतनीकरण कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वडखळ ते अलिबाग रस्त्याच्या चौपदरीकरणाची अधिसूचना काढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यासाठी सुमारे १७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यात एक बायपास, एक बोगदा आणि सुपर मॉडेल डिझाईनचा हा रस्ता असणार आहे.
अलिबागसाठी गेल्या १५-२० वर्षांतील हे पहिले मोठे काम असून, अवघ्या १२ मिनिटांत अलिबागहून वडखळ गाठता येणार आहे. महामार्ग प्राधिकरणाने नुकतीच वडखळ ते अलिबाग महामार्गासाठी भूसंपादन अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, त्याला भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने मंजुरीही दिली आहे.
भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. बंदर जोड प्रकल्पांतर्गत रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अलिबाग ते वडखळ या २५ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. यासाठी १७०० कोटींपैकी सुमारे ९०० कोटी रुपये हे भूसंपादनासाठी खर्च होणार आहेत.