माथेरान (वार्ताहर) : ई रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सनियंत्रण समितीने सध्या या ठिकाणी एकूण सात ई- रिक्षा खरेदी करण्याची मान्यता माथेरान नगरपालिकेस दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या पायलट प्रोजेक्टला हिरवा कंदील मिळला आहे.
दस्तुरी नाका ते सेंट झेवीयर्स कॉन्व्हेंट शाळा मार्गावर सध्या या ई- रिक्षा धावणार आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील दहा वर्षांपासून यासाठी सातत्याने श्रमिक हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यटकांची संख्या वाढत जाणार असल्याने आपसूकच सर्वांनाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील काही वर्षांपूर्वी अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान मिनिट्रेनची शटल सेवा सुरू होणार म्हणून आपला रोजगार हिरावतो की काय अशी भीती येथील घोडे मालकांसह अनेकांना वाटत होती. परंतु पर्यटक वाढत गेल्याने सर्वांच्या व्यवसायात भर पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ई -रिक्षा सुरू झाल्यास माथेरान मध्ये देशविदेशातील पर्यटकांची गर्दी आगामी काळात पहावयास मिळण्याची शक्यता आहे. आबालवृद्ध त्याचप्रमाणे ज्यांना माथेरान हे पर्यटनस्थळ पहावयाचे आहे, अशांना ई -रिक्षा वरदान ठरणार आहे.