प्रकल्पाबाबत केवळ चर्चा, लेखी व्यवहार झालेच नाहीत
मुंबई : नुसते परदेशात उद्योजकांना भेटून आपल्या राज्यात प्रकल्प येत नसतात, तर त्यासाठी उद्योगांना आपण सरकारतर्फे काय देतो, यासाठी हायपॉवर समितीची स्थापना करावी लागते, ती का स्थापन केली नाही, असे वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी करत अजित पवारांवर पलटवार केला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत कोणताही सामंजस्य करार झालाच नव्हता. याबाबतची फक्त चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे.
मविआ सरकारने ७ महिन्यांत या प्रकल्पासाठी काहीही केले नाही. १५ जुलैला शिंदे सरकार आल्यानंतर यासाठीची हायपॉवर कमिटी स्थापन झाली. ३८ हजार ८३१ कोटींचे इंसेंटिव्ह पॅकेज मंजूर केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करत आहेत. कालच वेदांता ग्रुपचे मालक अग्रवाल यांनी केलेले ट्विट याच प्रयत्नांना आलेले यश आहे. वेदांता प्रकल्पाशी संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.
गेली दोन वर्षे कंपनीच्या कामाला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो मिळाला नाही त्यामुळे हा प्रकल्प गुजरतला गेला असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवले. तसेच माझ्या राजीनामा देण्याच्या मागणीपूर्वी मग ७ महिने हायपॉवर कमिटी का स्थापन झाली नाही? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. रिफायनरीला कोण विरोध करते, याचेदेखील उत्तर विरोधकांनी जनतेला दिले पाहिजे, असे ते म्हणाले.