पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची वडिलोपार्जित शिवसेनेवरील पकड सुटली आहे, त्यांना पक्षाचे आमदार, खासदार, माजी मंत्री आणि पदाधिकारीही विचारत नाहीत हे वास्तव आहे. दिवसेंदिवस उद्धव यांच्या पक्षाचे नेते, पदाधिकारी व शिवसैनिक त्यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याने उद्धव यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. एकनाथ शिदे यांच्या गटाने तर ‘आम्ही म्हणजेच खरी शिवसेना’ असा दावा केल्यामुळे उद्धव यांचे धाबे दणाणले आहे. दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाला या वर्षी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान मिळेल की नाही, शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे आपल्याकडे कायम राहील की नाही, सर्वोच्च न्यायालयातून आपल्या पक्षाला खरी शिवसेना ठरवली जाईल की नाही, या विचारानेच ठाकरे आणि त्यांच्या शिल्लक सेनेची झोप उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी भारतीय जनता पक्ष ठामपणे उभा आहे, हे उद्धव यांना कळून चुकल्यामुळे त्यांचे हात-पाय लटपटू लागले आहेत. केवळ उसने अवसान आणून भावनिक आवाहन करण्यातच त्यांचा वेळ जातो आहे.
राज्याची असलेली सत्ता गमावली आणि येणाऱ्या निवडणुकीत मुंबई महापालिकाही ठाकरे परिवाराच्या हातातून जाणार, हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज राहिलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप युतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर दिवाळीनंतर फडकणार आणि मातोश्रीवर परिवाराला हात चोळत बसावे लागणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या विचारानेच उद्धव ठाकरे व शिल्लक सेना अस्वस्थ आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जशी जवळ येईल, तसे उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेकडून कुरबुरी आणि तक्रारी वाढत जातील. दादर, प्रभादेवी आणि त्यातही शिवाजी पार्क परिसर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा भक्कम गड होता. त्या किल्ल्याचे बुरुज उद्धव यांच्या पक्षप्रमुख पदाच्या कारकिर्दीत ढासळू आहेत. आमदार सदा सरवणकरसारखे बिनीचे शिलेदार त्यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे निघून गेले व राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी मोलाचा वाटाही उचलला. जी उद्धव यांनी चूक केली ती दुरुस्त करण्याच्या कामात सरवणकर आघाडीवर राहिले. त्यातही दादरच्या आमदारानेच उद्धव यांचे नेतृत्व झुगारून लावल्याने मातोश्रीला वेदना होणे स्वाभाविक आहे. पण ही वेळ कोणी आणली? याचे आत्मचिंतन करण्याची तयारी आजही उद्धव व शिल्लक सेनेच्या नेत्यांची नाही.
गणेश विसर्जनाच्या दिवशी दादर-प्रभादेवी येथे उद्धव गट आणि शिंदे गट यांची दोन स्वतंत्र व्यासपीठे एकमेकांच्या शेजारीच उभी होती. तेव्हा दोन गटांत झालेली शाब्दिक चकमक आणि त्याचे नंतर मारामारीत झालेले पर्यावसन यातून वातावरण अधिकच चिघळले. मुळात शिंदे गटाला आव्हान देण्याचे धाडस उद्धव यांच्या शिल्लक सेनेने कशासाठी करायचे? एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा आशीष शेलार यांना आव्हान देण्याची ताकद आणि क्षमता उद्धव यांच्या शिल्लक सेनेकडे उरली आहे का? आता आपले सरकार नाही, याचे निदान भान तरी मातोश्रीने ठेवले पाहिजे. राज्याचे प्रमुख कारभारी म्हणून काम करताना पोलीस आणि प्रशासनावर कसा दबाव आणला जात होता, हे काही लपून राहिलेले नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी राज्याचे मंत्री व मातोश्रीचे निकटवर्तीय पोलिसांना कशा सूचना देत होते हे सर्व जनतेने टीव्हीच्या पडद्यावरून बघितले आहे. आपले वरती बोलणे झाले आहे, असे सांगून मंत्रीमहोदय पोलिसांवर दबाव आणत होते, हे तर लांच्छनास्पद होते. सत्ता गेली तरी त्याची नशा अजून पूर्ण उतरलेली नसावी म्हणून शिल्लक सेनेचे काही नेते पोलीस ठाण्यावर जाऊन सरवणकरांवर कारवाई करा म्हणून कसा दबाव आणत होते, याचेही चित्रीकरण राज्यातील जनतेला बघायला मिळाले. आता धमक्या व अरेरावी करण्याचे दिवस संपले आहेत, हे कोणीतरी शिल्लक सेनेला सांगण्याची गरज आहे. दोन गटांत बाचाबाची, हमरीतुमरी, मारामारी झाली. पण आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप कशासाठी केला? सरवणकर हे मूळचे शिवसैनिक आणि उद्याही शिवसैनिक असणार. शिवसेनेच्या दोन गटांत संघर्ष व तोही पोलीस ठाण्यासमोर झाला, तेव्हा समोरच्यांवर गोळीबार करावा असे त्यांच्या मनातही आले नसेल; परंतु खोटे बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीने शिल्लक सेना सरवणकरांवर बेलगाम आरोप करीत आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी सदा सरवणकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ठाकरे-शिंदे गटांतील संघर्षात आता नारायण राणे मैदानात अशा बातम्या वृत्तवाहिन्यांवरून झळकल्या. एकनाथ शिंदे गट हा भाजपचा मित्र आहे. भाजपने व राणे यांनी ‘खरी शिवसेना’ असे शिंदे गटाला संबोधले आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे, असे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व नारायण राणे सातत्याने सांगत आहेत. मित्रपक्षाच्या आमदाराला विरोधी पक्षातील कोणी टार्गेट करत असेल, तर त्या आमदाराच्या पाठिशी उभे राहणे हे भाजपचेही कर्तव्य आहे. म्हणूनच ते स्वत: सरवणकरांना भेटायला गेले. पण या भेटीने शिल्लक सेनेचे धाबे दणाणले. सत्ता गेल्यामुळे केवळ तक्रारी आणि आरोप करणे एवढेच शिल्लक सेनेच्या हाती उरले आहे. उद्धव सेना रडीचा डाव खेळत आहे.