मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबईत साथीच्या आजारांचा धोका कायम आहे. मलेरिया, लेप्टो आणि स्वाईन फ्ल्यूचा धोका कायम असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अकरा दिवसांत मुंबईत मलेरियाचे २०७ रुग्ण आढळल्यामुळे पालिकेची डोकेदुखी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
पावसाळी आजार नियंत्रणात आणण्यासाठी पलिका उपाययोजना करत असली, तरी साथीचे आजार कमी व्हायचे नाव नाही. १ ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबईत मलेरियाचे २०७, डेंग्यूचे ८०, लेप्टोचे १८, तर स्वाइन फ्ल्यूचे ६ रुग्ण आढळले आहेत. सध्या मुंबईत लेप्टो आणि स्वाइन फ्ल्यूची रुग्णसंख्या वाढत असल्याचे पालिकेच्या माहितीतून समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोचा प्रसार वाढत असल्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये सप्टेंबर महिन्यात मलेरीयाचे ६०७, डेंग्यूचे २५६ आणि लेप्टोचे ८०, तर स्वाईन फ्ल्यूचे पूर्ण महिन्यात ९ रुग्ण आढळले होते. मात्र यंदा केवळ ११ दिवसांत स्वाइन फ्ल्यूचे ६ रुग्ण आढळल्याने पालिकेची चिंता वाढली आहे.
दरम्यान स्वाइन फ्ल्यू आणि लेप्टो आजाराबाबत दक्षता घेण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे. ताप, घसा दुखणे, डोके दुखणे,अंगदुखी, मळमळ अशी स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. अति ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी ही लक्षणे लेप्टोची आहेत. जर अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात उपचार घ्यावे, असा सल्ला पालिकेने दिला आहे.
आजार ११ सप्टेंबरपर्यंत
मलेरिया २०७
डेंग्यू ८०
लेप्टो १८
गॅस्ट्रो १२१
हेपटायटीस १४
चिकनगुनिया २
स्वाइन फ्ल्यू ६