Sunday, June 22, 2025

फळमाशीवर शीळ येथील शेतकऱ्याने शोधला प्रभावी उपाय

फळमाशीवर शीळ येथील शेतकऱ्याने शोधला प्रभावी उपाय

राजापूर (वार्ताहर) : सध्या काकडी, पडवळ, दोडकी अशा फळपिकांवर मोठ्या प्रमाणात फळमाशीचा प्रार्दुभाव झाला आहे. त्यामुळे ही फळे सडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर शीळ येथील तरुण शेतकरी सुनील गोंडाळ यांनी निरीक्षणाअंती यूट्यूबच्या आधारे प्रभारी उपाय शोधून काढत यशस्वी उपाययोजना केली आहे. सुनील गोंडाळ यांचा हा उपाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असून याचा फायदा आंबा पिकालाही होणार आहे.


फळांवर पडणारी ही फळमाशी तयार झालेल्या फळांवर मोठ्या प्रमाणात अॅटॅक करते. यावेळी ही फळमाशी या फळातील रस शोषून घेऊन त्यात ती अळी घालते. त्यामुळे या फळांना कीडसदृश लागण होऊन तयार फळे पूर्णत: बाधित होत आहेत. त्यावर गोंडाळ यांनी लूर गोळीचा वापर करत प्लास्टीक बाटल्यांच्या आधारे सापळा बनवत यावर प्रभावी उपाय शोधला आहे.


गोंडाळ हे छोट्या प्रमाणात आंबा व्यवसाय करतात. मागील हंगामात त्यांनी पाठविलेल्या आंबापेट्यात बहुतांशी आंबे खराब निघाल्याने त्यावर विचार करत त्यांनी फळमाशीच्या प्रार्दुभावामुळे आंबा फळ खराब होत असल्याचा निष्कर्ष काढला. मात्र यावर काय उपाययोजना करावी याबाबत त्यांनी यूट्यूबच्या आधारे काही माहिती मिळविली आणि कृषी पदवीका मिळविलेल्या गावातील तरूण नामदेव गोंडाळ यांच्या मदतीने लूर नामक गोळीचा वापर करत सापळा बनविला.


सध्या शेतकऱ्यांना पावसाळी काकडी, पडवळ, दोडकी यांची लागवड केली आहे. मात्र त्यावरही मोठ्या प्रमाणात या फळमाशांनी अॅटॅक केल्याचे निदर्शनास आल्यावर गोंडाळ यांनी हा उपाय करून पाहिला. त्यात त्यांना यश आले आहे. यासाठी प्लास्टीकच्या बाटलीत छोटे छोटे होल मारून अर्ध्यावर रंगीत पाणी भरले. त्यावर लूरची गोळी टांगली. लूरच्या वासाने आणि रंगीत पाण्याकडे माशा आकर्षित होतात आणि बाटलीत शिरतात. बाटलीमध्ये असलेल्या लूर गोळीच्या वासाने त्यांना गुंगी येते आणि आपसूक त्या खालच्या पाण्यात पडतात.


अशा प्रकारे त्यांनी सापळे बनवून फळमाशीचा प्रार्दुभाव रोखला आहे. येत्या हंगामात हापूस फळांसाठीही आपण हा प्रयोग करणार असल्याचे सांगितले. फळमाशीपासून फळांचे संरक्षण करण्यासाठी हा सोपा आणि किफायतशीर उपाय असून शेतकऱ्यांना हा प्रयोग करून आपले नुकसान टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. गोंडाळ हे छोटे शेतकरी असून आंबा आणि काजूची यशस्वी लागवड करत त्यापासून उत्पन्न मिळविले आहे. गत वर्षी या फळमाशीमुळे झालेल्या हापूसच्या नुकसानीतून निरीक्षण नोंदवत त्यांनी केलेली ही उपाययोजना छोट्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. त्यांच्या या निरिक्षण आणि उपाययोजनेचे कौतुक होत आहे.

Comments
Add Comment