Tuesday, April 29, 2025
Homeसाप्ताहिककोलाजम्हाळाची पूर्वपीठिका

म्हाळाची पूर्वपीठिका

अनुराधा परब

वासांसि जीर्णानी यथा विहाय,
नवानि गृहान्ति नरोपराणि,
तथा शरीराणि विहाय जीर्णा,
न्यन्यानि संयाति नवानि देही…

मृत्यूनंतर देहधारी जीव हा एखाद्या जीर्ण कपड्यांप्रमाणे देहाचा त्याग करून नवीन देह धारण करतो, असे भगवद्गीतेतील हा श्लोक सांगतो. देहाची नश्वरता, आत्म्याची शाश्वतता-अव्यक्तता याविषयी श्लोक भाष्य करतो. आत्मा हा निराकार, अव्यक्त, अचिंत्य, विकाररहित असून तोच नित्य सत्य असल्याचे औपनिषदिक ग्रंथांतूनही सांगितले गेले आहे. असा हा आत्मा जेव्हा देहधारण करतो तेव्हा तो कुणाचा तरी आप्त, प्रियजन होतो, त्याला नश्वरता प्राप्त होते. त्या देहाला सुखदुःखादी भावना जाणवतात, उपभोगता येतात किंवा ऐहिक जीवनातील चढ-उतारांना सामोरे जावे लागते. मृत्यूनंतर त्या विशिष्ट देहाचं जगणं थांबून तेथून पुढे सुरू होतो. नव्या देहापर्यंतचा आत्म्याचा प्रवास. जिथे लय आहे तिथे सुरुवातही आहे, त्यामुळे या मृत व्यक्तीला मोक्ष मिळावा आणि आत्म्याची पुढील वाटचाल ही सुकर व्हावी याकरिता पितृपक्षामध्ये तिथीनुसार श्राद्ध घालण्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये रूढ आहे.

देव ऋण, ऋषी ऋण आणि सर्वात शेवटी मातृ-पितृ ऋण या तिन्ही ऋणांतून मुक्त होण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे यज्ञ याग, अनुष्ठाने करण्याविषयी सांगितले गेले आहे. शिवतांडव स्तोत्र रचणाऱ्या रावणाने रावणसंहितेमध्ये पितृदोषाची लक्षणे आणि त्यावरील उपायांबद्दलचे विवेचन केलेले आहे. मनुष्याला पितृदोष असतील, तर त्याचे व्यावहारिक ऐहिक जगणे हे क्लेशकारक होण्याची शक्यता असते. कारण पितरांशी वंशपरंपरेने व्यक्ती त्याचे कुटुंब जोडलेले असते. त्यामुळे त्या पितरांची शांती होत नाही, पितृलोकातून त्यांना मुक्ती मिळत नाही, तोवर पितृदोष माणसाला छळतो, अशी एक धारणा आहे. पितरांचा आशीर्वाद नेहमी कुटुंबाला मिळावा तसेच पितरांनाही सद्गती मिळावी याकरिता भाद्रपद महिन्यातील वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंतच्या पंधरवड्यात अर्थात पितृपक्षात श्राद्धं घातली जातात. महाराष्ट्रात, कोकणात याला म्हाळ, म्हाळवस, महाळ असं म्हटलं जातं. मूळ महालय या संस्कृत शब्दाची ही अपभ्रंश रूपे आहेत. पितृपक्षात दिवंगत पितरे पृथ्वीवर वावरत असतात, असा एक समज आहे. त्या पितरांना अन्नदानादी कर्मांनी संतुष्ट करणे हे त्यांच्या वंशजांचे काम असल्याचे धर्मशास्त्र सांगते. ही कार्ये करताना त्यात पूर्वजांविषयी आदरभाव, त्यांचे स्मरण यामुळे त्याला “श्रद्धेने केले जाणारे” म्हणून श्राद्ध म्हटले जाते.

मध्ययुगामध्ये आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणारे नववर्ष भाद्रपद महिन्याच्या शेवटी संपत असे. वर्षाच्या अंतिम चरणातील अखेरचे पंधरा दिवस हे दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवण्याची परंपरा चित्रावशास्त्रींनी नोंदवलेली आहे. तर डॉ. पां. वा. काणे यांनी सूर्य कन्या राशीत असताना तसेच दक्षिणायन ऐन मध्यात आलेले असताना गजछायेच्या काळात अर्थात आषाढ महिन्यातील पौर्णिमेपासून पुढे पाच कक्ष, म्हणजे भाद्रपद कृष्ण पक्षात महालय श्राद्ध करावे, असे “हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र” या ग्रंथात म्हटले आहे. दक्षिणायनामध्ये स्वर्गातील देवांची रात्र असते आणि त्यावेळी पितृलोकात दिवस असतो, असा धर्मसंकेत प्रचलित आहे. त्यामुळेच या दक्षिणायनात पितरांना संतुष्ट करण्याविषयीचे संदर्भ आढळतात.

दैवतशास्त्राविषयी विचार करत असताना देवतांच्या प्रतिमानिर्मितीमागे जशी भीतीची भावना ही प्रबल असल्याचे आपण पाहिले तद्वतच पितरांसंदर्भात केल्या जाणाऱ्या विधींमध्येही तोच भाग प्रमुख असल्याचे दिसून येते. मृतात्म्यांठायी असलेल्या असामान्य शक्तीसामर्थ्याची कल्पना प्राचीन काळी अस्तित्वात असल्याचा संदर्भ ऋग्वेदात सापडतो. त्यामुळे मर्त्य मानवाचे ऐहिक जीवन सुरळीतपणे चालण्यासाठी मृतांचा रोष, नाराजी, राग दूर करणे त्यांना तृप्त करणे हे या पूजाविधीचे प्रमुख लक्षण झाले. याकरिता वर्षातील विशिष्ट दिवस केवळ त्यांच्यासाठी राखून ठेवत त्या काळात त्यांना संतुष्ट करणाऱ्या गोष्टींचे विधिवत अर्पण करण्याचा प्रघात पडलेला असावा. यात प्रामुख्याने अन्नदान तसेच पितरांना उद्देशून दिलेले उदक, पितृतर्पणही महत्त्वाचे आहे. कारण भारतीय संस्कृतीमध्ये अन्नालाच पूर्णब्रह्माचे स्वरूप म्हटले गेले आहे. अन्नदानं सर्वदानं प्रधानम्, यातून पितृपक्षातील अन्नदानाचे महात्म्य अधोरेखित झाले आहे.

सिंधुदुर्गातल्या म्हाळ, म्हाळवस परंपरा म्हणजे पूर्वजांच्या स्मरणाचा कौटुंबिक आणि सार्वजनिक अशा दोन्ही पातळ्यांवर केला जाणारा उत्सवच. फोंडाघाटापासून ते दोडामार्गापर्यंतच्या भागात म्हाळाची परंपरा एकसारखी नाही. रत्नागिरी, लांजा, देवगड पट्ट्यापर्यंत म्हाळात जेवणकार असतात शिवाय तिथे अन्नदानाला विशेष महत्त्व दिलं जातं. गावऱ्हाटीप्रमाणे कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या बाजूस काहींच्या घरचीही ऱ्हाटी असते. त्याला आदस्थान म्हणतात. घरच्या देवांचे पावित्र्य राखून म्हाळाचा नैवेद्य केला जातो. घरचा म्हाळ घालताना तिथे शाकाहारी, मांसाहारी दोन्ही पदार्थ असतात. तर देवस्थान किंवा वाडीचा म्हाळ हा फक्त शाकाहारीच असतो. पशू-पक्षी, निर्वंशं तसेच निवर्तलेल्या मित्रांसाठीही म्हाळाचा नैवेद्य वाढला जातो. यालाच वाडी असेही म्हटले जाते.

केळीच्या पानावर शक्यतो ही वाडी वाढण्याची प्रथा आहे. साधारणपणे कुटुंबातील व्यक्ती निधन पावल्यानंतर वर्षश्राद्धापूर्वी वर्षभरात किमान तीन अमावस्या श्राद्धकार्य केलं जातं. निधनानंतर तेराव्या दिवशी केलेल्या पिंडदानानंतर वर्षश्राद्धाला पिंडदानादी विधींसाठी ब्राह्मणाची आवश्यकता असते. मृत व्यक्तींच्या नावाने वर्षभरासाठी जेवणकार बांधून ठेवण्याची प्रथा सिंधुदुर्गात आहे. वर्षश्राद्धानंतरच्या पहिल्या पितृपक्षात महालय केला जातो. त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षात व त्याहीपुढे पितरांच्या नावे म्हाळ घालतेवेळी सिंधुदुर्गात ब्राह्मणाला बोलावणे हे ऐच्छिक राहते. अलीकडेच निधन पावलेल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबरच पूर्वजांचा, सवाष्ण गेली असल्यास तिचा तसेच बालवयात किंवा निधन पावलेल्या अविवाहित तरुण-तरुणींचा एकत्रितरीत्या म्हाळ घालताना प्रत्येकाच्या नावाने जेवणकार ठेवण्यात येतो. घरातील स्त्री आधी आणि नंतर पुरुष निधन पावला असल्यास जेवणकार म्हणून दाम्पत्याला बोलावले जाते. अन्यथा तीन पिढ्यांच्या पितरांकरिता पुरुषच जेवणकार म्हणून बोलावले जातात. हे जेवणकार कुटुंबातील न घेता नातेवाइकांपैकी असावेत, असा नियम आहे. लग्न न झालेले तरुण-तरुणी निधन पावले, तर वयात न आलेला निमा (कुमार), आकुवारीण (कुमारिका) जेवणकार म्हणून ठेवण्याची परंपरा जिल्ह्यात सारखीच आहे. कुटुंबात कुणाचा अपघाती, घातपाती वा शस्त्राने मृत्यू झाल्यास त्यांचा म्हाळ हा सर्वपित्रीच्या आदल्या दिवशी चतुदर्शीदिवशी घातला जातो.

पूर्वज ज्या ठिकाणी स्थायिक झाले ती मूळ जागा, जिथून त्या वंशाचा विस्तार वाढला तिथली मर्यादा, चतुस्सीमा, ग्रामदेवता यांची राखण रखवाली (कृपाशीर्वाद) कुटुंबावर असली पाहिजे म्हणून किमान वार्षिक उत्सवाला (दहिकाल्याला) तरी येऊन आपल्या रखवालीचा नारळ कोकणवासीय ठेवून जाणारच, असे बीडीओ विजय चव्हाण यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव सांगतो. वंशवेल विस्तार वाढला; परंतु त्याच्या मुळाला खतपाणी घातले जात नाही तोवर त्या विस्ताराला अर्थ राहात नाही, याच भावनेतून – धारणेतून म्हाळ मूळ गावी करण्याची परंपरा पिढी दर पिढी इथे चालत आलेली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -