मृणालिनी कुलकर्णी
गणेशोत्सव! सर्व बाजूने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल घडवून आणणारा. या गणेशोत्सवात अनेक बेरोजगारांना रोजगार मिळतो. मुख्यतः छोट्या-मोठ्या कलाकारांच्या कल्पकतेला अगदी घरापासून मंडळापर्यंत वाव मिळतो. प्रत्येकाचा वकूब वेगळा. मूर्तीच्या चेहऱ्यावरील, डोळ्यांतील भाव, रंगसंगती पाहता, श्रीगणेशाची इतकी सुंदर जिवंत मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकाराचा, पाठीमागे सजावट करणाऱ्या कलाकारांचा त्याच स्टेजवर कौतुक, सन्मान व्हायला हवा. कामाला पोचपावती मिळाली की, जगायला बळ मिळते. उद्योग जगतात, सण उत्सवात, काही विशेष कार्यक्रमांत, आपल्या नोकरीत, रोजच्या आयुष्यातसुद्धा प्रत्येक टप्प्यावर अनेक कामासाठी योग्य व्यक्तीचा महत्त्वाचा रोल असतो. त्यांची कामातील योग्यता ओळखा नि त्याची बूजही राखा.
आपले काम हीच आपली ओळख असते. त्यात अनेक सहकाऱ्यांचे अनुभव आपल्याला शिकवून जातात. ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकातील दोन गोष्टी शेअर करते.
मिशेल शॅन्डलर यांना वयाच्या विसाव्या वर्षीच आपली गोरी वस्ती सोडून नव्या नोकरीसाठी आदिवासींच्या ‘इगोली’ या छोट्या गावी यावे लागले. ऑफिस प्रमुख टॅगनी त्याला म्हणाले, “मुला, गेल्या वर्षी उन्हाळ्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मोटारीचं खूप नुकसान झालं. तेव्हा यंदा आमच्या मोटारी ठेवण्यासाठी पक्का आडोसा तयार करावा, हे काम तुम्ही करावं.” “पण सर, मला बांधकामाचा काहीही अनुभव नाही.”
माझ्याकडे लक्ष न देता ते गेले. मी माझ्या कल्पनेप्रमाणे भिंती व छपरासाठी लाकूड व इतर सामान मागविले. मी सांगेन तसे न बोलता काम सुरू झाले. जोडाजोडीच्या वेळी प्रथमच मी फिलोमन या मजुराच्या डोळ्याला डोळा भिडवला. काळ्या मजुराने गोऱ्या साहेबाच्या डोळ्याला डोळा भिडवणं त्यावेळी शक्य नव्हतं. छत वर चढविण्यापूर्वी पुन्हा त्यांनी माझ्या डोळ्यांत पाहिलं. मला प्रथमच तो ओझ्याखाली दबलेला भासला. माझी असमर्थता त्याच्या लक्षात आली. नंतर त्यांनी सगळ्या मजुरांना एकत्र बोलावून आराखडा काढून सूचना दिल्या. जुने काम मोडून त्यांनी नव्यानं काम सुरू केलं. सगळे हसत बोलत काम करू लागले. मी स्तब्ध उभा राहिलो. झालेले श्रम विसरून हसतमुखाने फिलोमन माझ्यासमोर उभा राहिला. “बॉसी, काम पुरे झाले.” आत्मविश्वासाने त्याचे डोळे चमकत होते. मीही उपकृत झालो. माझी असमर्थता त्यानी अत्यंत सहानुभूतीपूर्वक दूर केली. प्रथमच मी त्यांना माणूस म्हणून दर्जा दिला होता. तेही माझ्यासारखेच पोटार्थी होते. वंश भेदाचा कायदा किती निरर्थक आहे, याची जाणीव झाली. “काम करणाऱ्या सामाजिक दर्जापेक्षा त्यांच्या कामातील योग्यता महत्वाची असते” हे शिकून शहाणा झालो.
प्रत्येकापाशी स्वतःच्या कामाचा असलेला अनुभव, कुशलता पाहता ज्याचे काम त्यांनीच करावे असे म्हटले आहेच. थॉमस हक्सले म्हणतात, “कोण बरोबर आहे, त्यापेक्षा काय बरोबर आहे याला महत्त्व आहे.”
डिस्ने वर्ल्डमधील ‘कॅरेबियन चाचे’ हा विभाग पूर्ण झाल्यावर वॉल्ट डिस्ने स्वतः सर्वत्र शेवटची नजर टाकीत होते. काहीतरी त्यांना खटकत असल्यामुळे स्वतःवरच ते नाराज होते. सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन प्रत्येक विभाग परत बारकाईने बघायला सांगितलं. सगळ्या पुतळ्यांचे पोशाख, झोपड्या, झोपड्यांची कुंपणं, जंगल, जंगलातील प्राणी, झाडं-झुडपं त्यावरचे पक्षी, ध्वनी-प्रकाश योजना, बोटी, पाण्याचा नव्हे सर्व आवाज/हालचाली सारे तपासून पाहिले. सगळ्यांची मते घेण्यात आली, तरी चूक सापडेना. काहीतरी तरी कमी होतंच. डिस्नेमधला झाडू मारणारा सफाई कामगार हे सारे पाहत होता. तो पुढे झाला व म्हणाला, “डिस्ने, मी दक्षिणेत लहानाचा मोठा झालो. अशा उन्हाळ्याच्या रात्री खूप काजवे असतात जंगलात.” डिस्ने यांचा चेहरा एकदम खुलला. हेच मला कळलं नव्हतं. त्या झाडूवाल्याला खूप मोठे बक्षीस दिले आणि काही जिवंत काजवे व काही विजेच्या तांत्रिक कारामतीने त्या दृश्यात भरती केले नि रात्र चमचमू लागली.
‘वर्क इज वर्शिप’! धैर्य, सर्जनशीलता, मनापासून झोकून देऊन काम करणे हे कामाच्या ठिकाणचे माणसांचे गुणविशेष. काहीवेळा आपले सहकारी प्रसंगी जीवावर उदार होऊन काम करतात. त्याचेच डॉ. कलमांच्या अग्निपंख पुस्तकातील उदा. त्यांच्याच शब्दात.
– प्रो. सुधाकर हे माझ्या ‘पेलोड’ तयार करण्याचा प्रयोगशाळेतील सहकारी होते. (विविध प्रकारची यंत्रे त्यांना पेलोड्स म्हणतात.) एका उड्डाणासाठी आम्ही सोडियम आणि थर्माईटचे ज्वालाग्राही मिश्रण सावकाश योग्य त्या जागी पायरी पायरीने भरत होतो. थुम्बाला नेहमीप्रमाणे उष्मा होता. हवेतील आर्द्रता वाढली होती. सहावेळा ते मिश्रण योग्य दाबाने भरून झाले होते. नंतरच्या वेळेला सुधाकरच्या कपाळावरचा घामाचा एक थेंब त्या सोडियम थर्माईटच्या स्फोटक मिश्रणावर पडला आणि काय होते हे कळायच्या आत मोठा स्फोट झाला. क्षणार्धात खोलीने पेट घेतला. मी क्षणभर तसाच उभा होतो. पाण्याने सोडियमची आग अधिकच भडकते हे ठाऊक होते. ज्वालेने वेढलेल्या अवस्थेतही प्रो. सुधाकरने मनाचा तोल न ढळता खिडकीची काच फोडली आणि प्रथम मला खिडकीबाहेर चक्क फेकून दिले. मग त्यानी उडी मारली. त्यानंतर भाजलेल्या, कापलेल्या जखमांवर कित्येक आठवडे उपचार घेत होते. अशी ही कामातील गुंतवणूक, जे कामाच्या रूपात आपले स्वप्न जोपासतात. काम करताना आपली कामातील निवड, योग्यता नव्याने सिद्ध करतात. अशा असंख्य व्यक्ती आहेत, जे काम हीच आपली ईश्वर पूजा मानतात.
गणेशोत्सव हा दहा दिवसांचा उत्सव; परंतु काही लोक समाजासाठी, समाजातल्या आपल्या बांधवांसाठी आयुष्यभर काम करतात. ते काम मोठे असूनही त्या कामाच्या नोंदीचा वेग खूप कमी आहे. जग माणसांचे आहे. माणसातले देव दिसत नाहीत. ईश्वरभक्तीसाठी लोकांना मंदिरासाठी दानधर्म करणे सोयीचं वाटतं. आपल्या जवळच आपल्या गरजेचे कष्टकरी कितीतरी आहेत. त्यांच्याही ‘कामाची योग्यता’ ओळखून दान खुल्या दिलाने / हाताने करावे.
‘वर्क इज वर्शिप!’ ‘work is worship’