श्रीनिवास बेलसरे
हिंदी सिनेमाने केवळ मनोरंजनच केले असे नाही, तर अनेक सामाजिक प्रश्नही रंजकतेने हाताळले होते आणि जनजागृतीही केली होती. ‘अनपढ’ रिलीज झाला १९६२ ला! राजेंद्र भाटिया यांच्या या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते मोहनकुमार यांनी. सिनेमाची पूर्ण कथाच स्त्रीशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लिहिली गेली होती.
बलराज सहानी, माला सिन्हा, धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमात शशिकला, नझीर हुसेन, धुमाळ, अरुणा इराणी, बिंदू, मुमताज बेगम, मोहन चोटी असे इतर यशस्वी अभिनेते होते. राजेश खन्नाच्या ‘दुश्मन’मध्ये ‘वादा तेरा वादा’वर नाचणारी मादक नर्तिका म्हणून लक्षात राहिलेल्या बिंदूचा हा खरे तर पदार्पणाचा सिनेमा! यात मात्र ती एक साधीभोळी मुलगी आहे आणि तिच्या तोंडी राजा मेहंदी अली खान यांनी चक्क लोकभाषेतील एक गोड गाणे दीदीच्या
आवाजात दिलेले आहे –
“जिया ले गयो जी मोरा सावरिया.”
मदन मोहन यांचे सुरेल संगीत लाभलेल्या या सिनेमाची गाणी होती, राजा मेहंदी आली खान या मनस्वी गीतकाराची! तशी सर्व गाणी लोकांना आवडली. पण त्यातले एक मात्र आजही सर्वांच्या चांगलेच स्मरणात आहे. खरे तर जोवर माणसाच्या येणाऱ्या पिढीला तारुण्याचा अनुभव मिळतो आहे, स्त्री-पुरुष संबंधात शारीर अनुभूतीच्या पलीकडील प्रेमाला महत्त्व आहे, प्रेमात ‘स्वीकार, नकाराचे नाट्य’ घडणार आहे तोवर हे गाणे अजरामरच राहणार!
राजा मेहंदी अली खान यांनी या गाण्यात सजवलेली सहजसुलभ प्रेमभावना इतकी उत्कट आहे की, हे गाणे कधीच जुने होऊ शकणार नाही.
शंभूनाथ चौधरी (बलराज सहानी) या गर्भश्रीमंत माणसाने धाकटी बहीण असलेल्या लाजवंतीला (माला सिन्हा) लाडापोटी शाळेत पाठवलेले नाही. घरी नोकरचाकर असल्याने तिला घरातली इतर कामे येत नाहीत. चौधरीसाहेब बहिणीचे लग्न थाटामाटात ठाकूर महेंद्रनाथ यांच्या दीपक नावाच्या मुलाशी (धर्मेंद्र) लावून देतात. यातला विचित्र योगायोग म्हणजे दीपक हा पुस्तकवेडा तरुण आहे. त्याला मधुचंद्राच्या रात्री जेव्हा कळते की, लाजवंती अगदीच निरक्षर आहे. त्याचा त्याला प्रचंड धक्का बसतो. त्यामुळे अपेक्षाभंग झाल्याने दोघांचे संबंध पूर्णत: दुरावतात! संसाराच्या पहिल्याच दिवसापासून लाजवंतीला पतीकडून टोकाच्या तुच्छतेची वागणूक मिळू लागते, तर सासू-साऱ्यांकडून दिवस-रात्र छळाचा अनुभव येतो.
मात्र ती जेव्हा नोकराकडून भावाला खुशालीचे पत्र लिहून घेते, तेव्हा त्यात ‘सरस्वतीचंद्र’मधील नायिकेप्रमाणे आपल्या पतीसह सासरकडील सर्वांची मनापासून स्तुती करते. योगायोगाने ते पत्र धर्मेंद्रच्या हातात पडते आणि ते वाचून त्याचे डोळे उघडतात. आपण, पत्नीचा काही दोष नसताना, तिला किती यातना दिल्या, हे लक्षात आल्याने तो पश्चातापदग्ध होऊन तिची माफी मागतो. प्रायश्चित म्हणून तो स्वत:च तिला शिकवण्याचे आश्वासन देतो.
हे सुरू असताना धर्मेंद्रने शिकवलेली एक कविता माला सिन्हा तोंडपाठ म्हणून दाखवते. ती कविता म्हणजेच हे गाणे! लतादीदीच्या स्वरातील हे गीत आजही मनाला प्रसन्न करते, अंतर्मुख करते. मोठा दिलासा देते. दोन प्रेमिकांत, प्रदीर्घ काळानंतर मोठ्या मुश्किलीने प्रेमाची स्वीकृती होते, तेव्हाचा आनंद काही वेगळाच असतो.
आधी अतिशय तुच्छतेने वागवणाऱ्या पतीच्या वागण्यातील बदलाने, त्याच्या निस्सीम प्रेमाच्या अभिव्यक्तीने ती हरखून गेली आहे. त्या साध्या-भोळ्या पारंपरिक गृहिणीला पतीला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले आहे. ती उत्कट भावना गीतकारांनी मोठ्या खुबीने रंगवली आहे. गाण्याचे शब्द होते –
आपकी नज़रोंने समझा,
प्यार के काबिल मुझे…
दिलकी ऐ धड़कन, ठहर जा
मिल गयी मंजिल मुझे…
प्रेमिकाने आपल्याला स्वीकारले याचा तिला इतका आनंद आहे की, ती म्हणते ‘हृदया, तुझी धडधड आता थांबव, मला माझे ध्येय मिळाले आहे, आता आयुष्यात मिळवण्याचे काहीच शिल्लक नाही, या क्षणाला जरी हृदयक्रिया बंद पडून मृत्यू आला तरी मला चालेल!’
तिच्या मनात कृतज्ञतेची भावना इतकी दाटून आली आहे की, ती म्हणते –
जी हमें मंजूर हैं आपका ये फैसला,
कह रही हैं हर नजर,
बंदा परवर शुक्रिया!
हँसके अपनी जिन्दगीमें,
कर लिया शामिल मुझे…
दिलकी ऐ धड़कन, ठहर जा…
आपल्यातील कमतरतेमुळे जे प्रेम आपल्याला कधीच मिळणार नाही, असे वाटत होते, ते इतक्या सहज हाती लागले. या कल्पनेने वेडावलेल्या लाजवंतीला वाटते, आता जीवनात काही महत्त्वाचेच नाही. माझ्या जीवनाचे ध्येय ‘ते’ आणि ‘त्यांच्या’ जीवनाचे ध्येय मी बनले आहे! आता कसलीच चिंता नाही. येणाऱ्या कोणत्याची वादळाची आता मला भीती वाटत नाही. कारण माझ्या जीवन-नौकेला किनारा सापडला आहे. माझा प्रियकरच तो किनारा आहे.
आपकी मंजिल हूँ मैं,
मेरी मंजिल आप हैं…
क्यों मैं तुफ़ासे डरूं,
मेरा साहिल आप हैं…
कोई तुफानोंसे कह दे,
मिल गया साहिल मुझे…
आपकी नज़रोंने समझा…
त्याकाळी प्रेमाची परिपूर्ती ही मीलनात/लग्नात होणेच अभिप्रेत असे. त्यामुळे लग्न झालेले असले तरी लाजवंतीच्या मनात लग्नातील शहनाईचे मंगल सूर पुन्हा वाजू लागतात आणि ती म्हणते-
पड़ गई दिलपर मेरे,
आपकी परछाईयाँ,
हर तरफ बजने लगी
सैकड़ों शहनाईयाँ…
हल्लीसारखे केवळ इहलोकातील सर्व सुखांनी पायाशी लोळण घेणे म्हणजेच जीवन सफल होणे, अशी व्याख्या त्याकाळी नव्हती. त्यामुळे साहित्यात, गाण्यात, कथा-कादंबऱ्यात व्यक्त होणाऱ्या सफल जीवनाच्या चित्रात ‘या लोकातील’ सुखाबरोबरच ‘परलोकातील’ सुखही महत्त्वाचे मानले जाई. म्हणून गाण्यात पुढचे शब्द येतात –
दो जहाँकी आज खुशियाँ,
हो गयी हासिल मुझे,
आपकी नज़रोंने समझा,
प्यार के काबील मुझे…
प्रेमाचे इतके भक्तिमय, इतके समर्पित, इतके उत्कट रूप दिसणे आता दुर्मीळच ना…! पण म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!