नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्याचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अरूणाचल प्रदेशमधील किबिथूमध्ये एका रस्त्याला आणि सैन्य स्टेशनला रावत यांच नाव देण्यात आले आहे. लोहित खोऱ्यात चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेले, लष्करी स्टेशन आता जनरल बिपिन रावत या नावाने ओळखले जाईल आणि याच गावातील डोंगराळ भागातील प्रमुख रस्त्याला देखील रावत यांचे नाव दिल जाणार आहे.
जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. कर्नल म्हणून, रावत यांनी १९९९ ते २००० पर्यंत किबिथू येथे ५/११ गोरखा रायफल्सच्या बटालियनचे नेतृत्व केले. शनिवारी एका कार्यक्रमात अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर बीडी मिश्रा, मुख्यमंत्री पेमा खांडू, पूर्व लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांनी २२ किमी लांबीच्या रस्त्याला जनरल बिपिन रावत यांचे नाव दिले. हा रस्ता वालोंग पासून किबिथूला जोडतो.
या कार्यक्रमाला रावत यांच्या मुलींसह अनेक वरिष्ठ आधिकारी उपस्थित होते. आणि तिथेच किबिथू मिलिटरी कॅम्पचे नाव बदलून जनरल बिपिन रावत मिलिटरी गॅरिसन करण्यात आले. गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी तामिळनाडूतील कुन्नूरजवळ झालेल्या अपघातात जनरल रावत यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत त्यांची पत्नी मधुलिका यांच्याशिवाय अन्य १२ लष्करी अधिकारी शहीद झाले होते.