नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान मोदी यांनी देशात ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली. त्याअंतर्गत अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. आता हाय स्पीड रेल्वेचे चाक आणि ट्रॅक देशातच बनवणार असल्याची महत्त्वाची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी निविदा काढण्यात आली आहे. यामुळे देशात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारत आता देशातच हाय स्पीड व्हील आणि हाय स्पीड रेल्वे तयार करणार आहे. आतापर्यंत व्हील आणि ट्रॅक आयात केले जात होते. परंतु आता ते भारतातच तयार करण्यात येणार असल्याने आगामी काळात निर्यात केले जाणार आहेत. ताशी १२० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांसाठी हाय-स्पीड चाकांची आवश्यकता असते. एलएचबी, वंदे भारत (लक्ष्य ४००) या गाड्यांना ही चाके असतात. याबाबत ‘मेक इन इंडिया व्हील करार’ या नावाचा एक करार करण्यात आला आहे.
१९६० पासून युरोपमधून ही चाके आयात केली जात होती. परंतु आता ही चाके भारतात तयार केली जाणार आहेत. त्यासाठी संपूर्ण निविदा प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. वर्षामध्ये २ लाख चाकांची गरज आहे. सध्या एक प्लांट उभारायचा आहे. प्लांटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला ८० हजार चाके तयार करण्यासाठी दिली जातील. त्याची रक्कम वार्षिक ६०० कोटी इतकी आहे. १८ महिन्यांत कारखाना सुरू करून उत्पादन सुरू करण्याची योजना आहे, असेही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.