नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हल्ले वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा हल्ल्यांच्या काही घटनांचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. आता भारतीय वंशाच्या खासदारालाही धमकी देण्यात आली आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेतील एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली. याशिवाय त्यांना मायदेशी परतण्याचा इशारा दिला.
प्रमिला जयपाल यांनी गुरुवारी सोशल मीडियावर या धमकीच्या फोनच्या पाच ऑडिओ क्लिप शेअर केल्या आहेत. प्रमिला जयपाल या भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार आहेत. त्यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला आहे. प्रमिला जयपाल यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अज्ञात व्यक्ती त्यांना वर्णावरून अर्वाच्य भाषेत बोलताना आणि मायदेशी परतण्यास सांगत आहे. अन्यथा त्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असेही धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांनी ट्विट करत लिहिले आहे की, ‘नेते नेहमीच त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील धोका किंवा घटनांबाबत जनतेपर्यंत पोहोचू देत नाहीत. पण आपण हिंसाचाराला नेहमीचीच किंवा सामान्य मानूनं त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. या हिंसाचाराच्या मुळाशी असलेला आणि त्याला प्रोत्साहन देणारा वर्णद्वेष आणि लिंगभेद देखील आम्हांला स्वीकार्य नाही.’
यापूर्वी अमेरिकेत उन्हाळ्यात एका व्यक्तीने भारतीय-अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांना पिस्तूल दाखवून धमकावले होते. ब्रेट फोर्सेल या ४९ वर्षीय व्यक्तीने प्रमिला जयपाल यांना सिएटल येथील आमदार निवासस्थानाबाहेर पिस्तूल दाखवत त्यांना धमकी दिली होती. या व्यक्तीने पिस्तूल दाखवत प्रमिला आणि त्यांच्या पतीवर ओरडण्यास सुरुवात केली. याप्रकरणी आरोपी ब्रेट फोर्सेल याला अटक करण्यात आली होती.
गेल्या काही काळात भारतीयांवर वर्णद्वेषी हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकताच अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कॅलिफोर्नियातील टॅको बेल रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी कृष्णन जयरामन नावाची व्यक्ती भारतीय रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर घेण्यासाठी गेला असता, त्याच्यावर वर्णद्वेषी हल्ला करण्यात आला. आरोपीने त्याला सांगितले की, तू हिंदू आहेस जो गोमूत्राने आंघोळ करतो.
अमेरिकेतील टेक्सास येथे चार भारतीय वंशाच्या महिलांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. अमेरिकन-मेक्सिन महिलेने भारतीय वंशाच्या चार महिलांना शिविगाळ केली. टेक्सासच्या रस्त्यावर फिरणाऱ्या चार भारतीय महिलांसोबत अमेरिकन-मेक्सिन महिलेने गैरवर्तन केले. मेक्सिकनं भारतीय महिलांना शिविगाळ करत त्यांना मारहाण केल्यानंतर बंदूक दाखवून गोळ्या घालण्याची धमकीही दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपी मेक्सिकने महिलेला अटक केली.