कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारमधील कायदामंत्री मलय घटक यांच्या तीन ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. कोळसा वाटप घोटाळ्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे.
केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी मलय घटक यांच्या आसनसोल येथील घराला चारही बाजूंनी घेरले आहे. कोलकात्यासह सुमारे सात ठिकाणी सीबीआयने छापा टाकला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने तपासासंदर्भात मलय घटक यांचीही चौकशी केली. मलय घटक हे आसनसोल उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत.
कोळसा घोटाळ्यात घटक यांची काही भूमिका होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न दोन्ही तपास यंत्रणा करत आहेत. या प्रकरणात ईडी मनी लाँड्रिंग आणि सीबीआय गुन्हेगारी पैलूंचा तपास करत आहे. आसनसोलजवळील कुनुस्टोरिया आणि कजोरा भागातील इस्टर्न कोलफिल्डच्या भाडेतत्त्वावरील खाणींमधून कोळशाची बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी या दोन्ही संस्था करत आहेत. ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड बंगालच्या पश्चिम भागात अनेक खाणी चालवते. अनेक वर्षांपासून अवैधरित्या उत्खनन केलेला कोळसा काळ्या बाजारात विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केंद्रीय यंत्रणांनी अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांचीही चौकशी केली.