‘मुलीला समोर आणा’ म्हणत खासदार नवनीत राणा यांचा पोलिस ठाण्यात रुद्रावतार
तब्बल २४ प्रकरण घडल्यानंतरही पोलीस प्रशासन ढिम्म असल्याचे भाजप खासदार अनिल बोंडे यांचा आरोप
अमरावती : अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. याआधीही अशा प्रकारच्या घटना अमरावतीमध्ये झालेल्या आहेत. तसेच लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवनीत राणा यांनी आरोप करताना म्हटले की, अमरावतीची बदनामी का होत आहे. १९ वर्षांची हिंदू मुलगी आहे. त्या मुलाला पकडून आणले आहे. रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काही समोर येत नाही. मात्र मुलगी कुठे आहे याबाबत उत्तरं दिली जात नाहीत. त्या मुलाच्या परिवाराला येथे पकडून आणा, एका तासात सगळे बाहेर येईल, असेही राणा म्हणाल्या. दोन तासांत मुलीचा शोध घ्या, असा अल्टिमेटम दिला असल्याचे राणा म्हणाल्या. या मुलांची एक टोळी आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना मुलीच्या पालकांनी सांगितले की, माझी मुलगी १२.३० वाजता बॅंकेत गेली. मात्र तिचा फोन नंतर बंद झाला. आमच्या घरी तो मुलगा कधीच आलेला नाही, असे या मुलीच्या पालकांनी सांगितले.
पालक तक्रारी घेऊन गेले तर त्यांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात घेतल्या जात नाहीत : भाजप खासदार अनिल बोंडे यांचा आरोप
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, धारणी आणि अमरावती अशी दोन प्रकरणं आहेत. धारणीच्या मुलीला हैदराबादला नेण्यात आले आहे. त्या मुलीने देखील फोन करुन मला अमरावतीला यायचे आहे. धारणी आणि अमरावतीच्या पोलिसांना मी विनंती केली होती की, त्या मुलींना शोधून सोडवून आणा. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये जेवढं गांभीर्य दाखवायला हवे होते, तेवढे गांभीर्य दाखवलेले नाही. धारणीमध्ये वीस प्रकरणे अशाच प्रकारची झाली आहेत तर अमरावतीमध्ये चार प्रकरणे झाली आहेत. या मुलींचे पालक तक्रारी घेऊन गेले तर त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत, अशा नातेवाईकांच्या तक्रारी आहेत, असे खासदार बोंडे यांनी सांगितले.
‘तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला’ : नवनीत राणा पोलिसांवर भडकल्या
पतीने मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले होते. मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला. तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला. यादरम्यान पोलिस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.